महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जीवनात यशस्वितेसाठी वाचनसंस्कृती वाढली पाहिजे - पालकमंत्री. डॉ. रणजीत पाटील सोमवार, ०४ डिसेंबर, २०१७
  • अकोल्यात ग्रंथोत्सवाचे थाटात उदघाटन
अकोला : जीवनात यशस्वी होण्यासाठी वाचन आवश्यक आहे, वाचनामुळे ज्ञानात भर पडण्याबरोबरच जीवन जगणे सुलभ होते. अनेक अडचणी, समस्या वाचनामुळेच दूर होतात. वाचनाची ही संस्कृती टिकली पाहिजे, वाढली पाहिजे. वाचन संस्कृती एक चळवळ बनली पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी ग्रंथोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केले.

अकोला येथील सिव्हील लाईन परिसरातील श्रीमती ल.रा.तो. वाणिज्य (एल.आर.टी.) महाविद्यालयात आयोजित दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री यांच्या हस्ते आज झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. शांताराम बुटे, ग्रंथमित्र प्रा.डॉ. एस.आर.बाहेती, प्राचार्य डॉ.श्रीप्रभू चापके, शिक्षणाधिकारी (माध्य) प्रकाश मुकुंद, जिल्हा ग्रंथालय संस्थांचे अध्यक्ष शामराव वाहुरवाघ, अमरावतीचे सहाय्यक ग्रंथालय संचालक जगदीश पाटील आदी उपस्थित होते.

वाचन संस्कृती पुढे नेण्यासाठी आज पुस्तकांबरोबरच ई-लायब्ररी उपलब्ध आहे. त्यामुळे माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, वाचन संस्कृती वाढविण्यात सार्वजनिक वाचनालयाचा मोठा वाटा आहे, अशी वाचनालय वाढणे अत्यंत गरजेची आहे. या वाचनालयांना येणाऱ्या अडचणी, समस्या सोडवण्यासाठी शासनाचा प्रतिनिधी म्हणून निश्चितपणे प्रयत्न केला जाईल.

पालकमंत्री म्हणाले की, वाचनातून मिळालेले ज्ञान इतरांनाही दिले गेले पाहिजे, जेणेकरून पुढच्या पिढीला त्याचा उपयोग होईल, यासाठी पालकमंत्री यांनी स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण परमहंस यांनी केलेल्या ज्ञानदानाचे उदाहरण यावेळी दिले. तसेच आपला मित्र वाचनामुळे कसा आयएएस झाला याबाबतची माहिती दिली.

यावेळी श्री. बाहेती यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जिल्हा ग्रंथपाल दिपक गेडाम यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. गोपाल सुरे यांनी तर आभार प्रदर्शन नवल कवडे यांनी केले. यानंतर ग्रंथोत्सवानिमित्य आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे फित कापून पालकमंत्री यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने उभारण्यात आलेल्या ‘लोकराज्य’ मासिक स्टॉलला भेट दिली.

ग्रंथदिंडी ठरले आकर्षण
ग्रंथोत्सवानिमित्त सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात आली. महापौर विजय अग्रवाल यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचा शुभारंभ करण्यात आला. या ग्रंथदिंडीत महिला वारकऱ्यांसोबतच विद्यार्थी, नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. टाळ-मृदंगाच्या गजरात निघालेली दिंडी अकोलावासियांसाठी आकर्षण ठरली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा