महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
उजनीचे पाणी लातूरला धनेगाव मार्गे खास बाब म्हणून येणारच ! - पालकमंत्री अमित देशमुख सोमवार, ०९ मार्च, २०२०


पाणीपुरवठा योजनेचा पायलट प्रॉजेक्ट राबविण्यासाठी लातूर व उस्मानाबाद जिल्ह्याची निवड
शहरातील वाहतुकीसाठी पार्कींग व्यवस्था व ट्रॉफीक पार्कची उभारणी करावी
लातूर शहरात मुख्य रस्त्यावर १५५ सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसणार

लातूर :
राज्यातील महाविकास आघाडी सकराने पाणीपुरवठा योजनेचा पायलट प्रॉजेक्ट राबविण्यासाठी लातूर व उस्मानाबाद जिल्ह्याची निवड केली असून लातूर शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी उजनी धरणातून लातूरला धनेगावमार्गे खास बाब म्हणून पाणी येणारच, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री लातूर जिल्हा अमित विलासराव देशमुख यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन सभागृहात आयोजित लातूर शहर पाणीपुरवठा व शहरातील वाहतूक व्यवस्था बैठकीत ते बोलत होते. बैठकीत अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखाना अध्यक्ष दिलीपराव देशमुख होते. बैठकीस महापौर विक्रांत गोजमगुंडे, जिल्हाधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत, पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर उपस्थित होते.

पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पाणीपुरवठा योजनेसाठी लातूर व उस्मानाबाद जिल्ह्याची प्रायोगिक तत्वावर पथदर्शक प्रकल्प (पायलट प्रॉजेक्ट) साठी निवड केलेली आहे. लातूर शहराचा पाणी प्रश्न कायमचा सुटावा व शहरातील सर्वांना स्वच्छ व निर्मळ पाणी दररोज मिळण्यासाठी खास बाब म्हणून उजनीचे पाणी धनेगाव मार्गे लातूरला येणार आहे. भविष्यात पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे लागणार असून त्यासाठी पाणी व वीज वापरणाऱ्यांनी देयक तर द्यावे लागणार आहेत. यासाठी संबंधित विभागाने नियोजन तात्काळ करावे. अशा सूचना दिल्या तसेच महाऊर्जा विभागाने धनेगाव येथे सौरउर्जा प्रकल्प निर्मितीसाठी ताबडतोबीने प्रस्ताव दाखल करावा असे निर्देश त्यांनी दिले.

लातूर शहरातील वाहतूक व्यवस्थेबाबत पालकमंत्री श्री. देशमुख म्हणाले की, शहरातील रस्त्यालगत पार्किंग व्यवस्था करुन शहरातील मुख्य रस्त्याच्या शासकीय जागा त्वरीत मोकळया कराव्यात. शहरात ट्रॉफीक पार्क उभे करा. शहरातील रस्त्यावर बसविण्यासाठी १५५ सीसीटीव्ही कॅमेरे दिले जातील. रिंगरोडवरील संबंधित विभागाने सर्विस रस्ते मोकळे करावेत. महानगरपालिकेने विद्युत देयकाबाबत महावितरण बरोबर चर्चा करुन ताबडतोब निर्णय घ्यावा तसेच विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय संस्थानने पाण्याचा पुर्नवापर करण्यासाठी पर्यावरण पुरक अद्यावत यंत्रणा निर्माण करावी असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी बैठकीच्या अध्यक्ष पदावरुन माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले की, महानगर पालिका प्रशासनाने पाणी साठवणूक व वितरणाचे सूक्ष्म नियोजन करुन सर्वांना समान पाणीवाटप करण्याचे नियोजन करावे. पाण्यावर सर्वांचाच समान हक्क आहे. भविष्यात शहराचा विचार करुन शहरात नवीन पाच जलकुंभ उभारावेत असे सूचित केले. व शहराची निकड पाहता चार ठिकाणी भाजी मार्केट उभारा व वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे चालू करण्याच्या संबंधिताना सूचना दिल्या.

प्रारंभी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी शहरातील पाणीपुरवठा बाबतची पीपीटीव्दारे सादरीकरण करुन विस्तृत माहिती विशद केली. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र माने यांनी वाहतूक व्यवस्थेबाबतची माहिती दिली. या बैठकीस जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागाचे विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा