महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
`दिवा संस्कृती` बंद झाल्याने शासन- प्रशासन व जनतेतील अंतर कमी होणार : जिल्हाधिकारी डॉ.पांढरपट्टे गुरुवार, २० एप्रिल, २०१७
धुळे : लाल दिवा काढून घेण्याचा महत्त्वूपर्ण निर्णय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. त्यामुळे प्रशासन व जनतेतील अंतर कमी होण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. या निर्णयाचे आपण सर्वांनी स्वागतच करायला हवे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी येथे केले.

नागरी सेवा दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात कार्यक्रम झाला. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी महानगरपालिकेच्या आयुक्त संगीता धायगुडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, भारतीय स्टेट बँकेचे सहाय्यक महाप्रबंधक रवी नायडू उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ.पांढरपट्टे म्हणाले, 21 एप्रिल 1947 रोजी भारतीय प्रशासकीय सेवेतील पहिल्या तुकडीला तत्कालिन गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी संबोधले होते. त्यांनी आपल्याकडून फार मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. त्यामुळे 21 एप्रिल हा दिवस नागरी सेवा दिन म्हणून साजरा केला जातो. आपणही सर्वसामान्य नागरिक आहोत. आपण स्वत:ला वेगळे का समजावे?, त्यामुळे आपण आता लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे.

लाल दिवा, पिवळा दिवा माणसा-माणसामधील अंतर वाढविणाऱ्या गोष्टी होत्या. ते गेले ही चांगली गोष्ट झाली. या निर्णयाचे भारतीय नागरिक म्हणून आपण स्वागत केले पाहिजे. आपण नागरिकांमध्ये गेले पाहिजे. त्यांच्यात रमले पाहिजे. चांगले कार्य करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव जनता नेहमीच काढते. देवमामलेदार हे त्यापैकीच एक उदाहरण आहे, असेही जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी नमूद केले.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. हुलवळे म्हणाले, जनतेच्या गरजेनुसार सेवा पुरविणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. नैपुण्यपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या अधिकाऱ्यांचा नागरी सेवा दिनानिमित्त गौरव करण्यात येतो. त्यापासून इतरांनाही प्रेरणा मिळते. तसेच सर्वसामान्य जनतेला उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करुन सेवा उपलब्ध करुन दिल्यास लोकशाहीच्या बळकटीकरणालाही चालना मिळते, असेही नमूद केले. यावेळी महानगरपालिकेच्या आयुक्त संगीता धायगुडे, उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक धीरज चौधरी, भारतीय स्टेट बँकेचे सहाय्यक महाप्रबंधक श्री. नायडू, नितीन ठोके, कृषी उपसंचालक बी. के. वरघडे, शिरपूरचे तहसीलदार महेश शेलार, वनपाल के. डी. देवरे, बाळू भामरे, कृषी सहाय्यक एम. सी. पाटील, मनोज पाटील, पी. बी. मोरे, सहाय्यक लेखाधिकारी सुनील मते, डॉ. हर्षदा पवार, निरीक्षक सी. डी. बागूल यांचा आपापल्या क्षेत्रात नैपुण्यपूर्ण कामगिरी बजावल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

तत्पूर्वी श्री.चौधरी, श्री. ठोके, अखिलेश शिंगारे, धुळे पंचायत समितीचे प्रभारी उपअभियंता ए. बी. पाटील, श्री. मिसाळ, श्री. वरघडे, डॉ. पवार, श्री. बाविस्कर, संदीप वानखेडकर यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आपण बजावलेल्या कामगिरीची माहिती दिली. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. हुलवळे यांनी प्रास्ताविक व आभार मानले. तहसीलदार ज्योती देवरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विविध विभागांचे वरीष्ठ अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा