महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
वृक्ष लागवड, जल संवर्धन पर्यावरणाला पूरक - हरिभाऊ बागडे रविवार, १६ जुलै, २०१७
औरंगाबाद : माहेश्वरी समाज राबवत असलेली वृक्ष, पाणी आणि स्वच्छता मोहीम सर्व समाजासाठी प्रेरणादायी आणि आदर्श ठरणारी असून पर्यावरणासाठी पूरक आहे. इतर समाजानेही माहेश्वरी समाजाचा आदर्श घेऊन शासनाच्या वृक्ष लागवड मोहीम, जलयुक्त शिवार अभियान आणि स्वच्छता अभियानामध्ये पुढाकार घेऊन सहभाग नोंदवावा, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले.

नगर नाका ते गोलवाडी-वाळूज रस्त्याच्या बाजूला माहेश्वरी मंडळातर्फे 2000 वृक्षांचे रोपण आणि संवर्धनाच्या उद्घाटनपर कार्यक्रमात ते बोलत होते. छावणी नाका येथे आयोजित कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती देवयानी डोणगावकर, भारतीय सेनेचे कर्नल श्री. शर्मा, श्री. राणा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष दामूआण्णा नवपुते, नंदकुमार घोडेले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल चव्हाण, माहेश्वरी मंडळाचे पोपटलाल चोरडिया, अमित बाहेती, सुनिल मालाणी, गणेश राठी, अरुंधती शर्मा यांची उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर लक्ष्मीमाता मंदिर परिसरात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले की, माहेश्वरी समाज सातत्याने सार्वजनिक हिताचे कार्य करत आहे. नगर नाका ते वाळूज रोड पर्यंत करण्यात येणाऱ्या वृक्ष लागवडीचे संवर्धनही करण्याची जबाबदारी समाजाने घेतली आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. इतर समाजालाही प्रेरणादायी आणि आदर्श असा हा उपक्रम राज्याबरोबरच देशाला पथदर्शी आहे. शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेची यंदाची संकल्पपूर्ती झाली असली तरी यापुढेही राज्यात वृक्षलागवडीसाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. वृक्षलागवडी बरोबरच संवर्धनही महत्त्वाचे असल्याने ते होणे गरजेचे आहे. तसेच वृक्ष लागवडीमुळे प्रदूषणविरहित वातावरण निर्माण होण्यास मदत होते. त्यामुळे आरोग्य सुदूढ राहते म्हणून स्वयंसेवी संस्थांनी, तरुणांनी यामध्ये सहभागी होण्याचेही आवाहन श्री. बागडे यांनी केले. भारतीय सेनाही वृक्ष लागवड मोहिमेत मोठे कार्य करत असल्याचे सांगताना पाणीसंवर्धन आणि स्वच्छता अभियानाबाबत उपस्थिताना त्यांनी मार्गदर्शन केले.

महेशपूजन आणि दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोपटलाल चोरडीया यांनी केले. कर्नल शर्मा, श्री. चव्हाण यांनीही यावेळी आपले विचार मांडले. सूत्रसंचालन नितीन तोष्णीवाल यांनी केले. आभार अनिल बाहेती यांनी मानले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा