महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे - पालकमंत्री दीपक केसरकर मंगळवार, ०५ फेब्रुवारी, २०१९


सिंधुदुर्ग :
आपापसातील मतभेद विसरून एकत्र आल्यानेच खऱ्या अर्थाने विकास शक्य होतो. जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज सांगेली येथील पुलाच्या भूमिपूजनानिमित्त आयोजित सोहळ्या प्रसंगी केले.

सांगेली येथे राज्यस्तरीय अर्थसंल्पातून मंजूर केलेल्या पुलाचे भूमिपूजन आज पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता ए.के.निकम, शाखा अभियंता एस.एस.पाटील, शाखा अभियंता श्री. पोहरे, ठेकेदार अमेय आरोंदेकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्ह्यामध्ये सध्या सर्वत्र विकासकामे सुरू असल्याचे सांगून पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, जिल्हावासियांच्या जीवनामध्ये समृद्धी येणे गरजेचे आहे. त्यासाठी शासन विविध योजना राबवत आहे. या योजनांचा लाभ जिल्हा वासियांनी घ्यावा. चांदा ते बांदा ही एक महत्त्वाकांक्षी योजना असून त्या माध्यमातून लोकांचे जीवन समृद्ध करण्याचा मानस आहे. या योजनेमध्ये भात शेतकऱ्यांना भात कापणीसाठीची यंत्रे देण्यात येणार आहेत. तसेच हॅपी एग्ज अंतर्गत कुक्कुट पालनासाठी १०० कोंबडीची पिल्लं, शेळी-मेंढी पालनासाठी शेळ्या व मेंढ्या, देशी गायी पालनासाठी गायी यांचा पुरवठा लाभार्थ्यांना करण्यात येणार आहे. ७५ टक्के अनुदानावर हे वाटप करण्यात येणार आहे. तसेच यातील २५ टक्क्यातील १५ टक्के वाटा बँकेने भरावा यासाठीचे नियोजन सुरू आहे. त्यामुळे फक्त १० टक्के रक्कम भरून या योजनांचा लाभ घेता येणार आहे. तरी जास्तीत जास्त जिल्हा वासियांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

पालकमंत्री म्हणाले, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विकास कामांसाठी निधी दिला जातो. हा निधी जनतेच्या विकासासाठी आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून होणाऱ्या प्रत्येक कामाच्या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीचे फलक लावण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. हा निधी लोकांच्या विकासासाठी असल्याने त्यांनी स्वतः या निधीच्या विनियोगाविषयी जागरुक असावे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा