महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
निवृत्तीनाथ महाराज मंदिराच्या पुनर्निर्माण कामासाठी लवकरच स्वतंत्र अधिकारी - पालकमंत्री गिरीष महाजन शुक्रवार, १२ जानेवारी, २०१८
नाशिक : निवृत्तीनाथ महाराज मंदिराच्या पुनर्निर्माण कामासाठी स्वतंत्र प्रशासकीय अधिकारी नेमण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले.

त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रा महोत्सवानिमित्त निवृत्तीनाथ महाराज समाधीची पालकमंत्री श्री.महाजन यांनी पत्नी साधनाताई यांच्यासह आज पहाटे शासकीय महापूजा केली. यावेळी ते बोलत होते. पूजेप्रसंगी आमदार बाळासाहेब सानप, आमदार निर्मला गावित, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, मंदिर संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. संजय महाराज धोंगडे, श्रीकांतजी भारती, उपविभागीय अधिकारी राहूल पाटील, मुख्याधिकारी चेतना केरुरे तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री.महाजन म्हणाले, येथील पावित्र्य व श्रद्धेमुळे मंदिराचे वेगळे महत्व असून मंदिराची नव्याने भव्य वास्तू उभी राहिल. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भमिपूजन झाल्याने या काळ्या पाषाणात उभ्या साकारणाऱ्या या मंदिराच्या कामास गती येणार आहे. कुंभमेळ्याच्या उत्कृष्ट कामांमुळे येथील रस्ते चांगले आहेत. तसेच भाविकांसाठी असंख्य सुविधा निर्माण झाल्या आहेत. येथील निसर्ग संपन्न डोंगररांगा, तलाव, पौराणिक ठिकाणे यांचा पर्यटन विकासासाठी देखील उपयोग होईल.

श्री.महाजन म्हणाले, कुंभमेळ्याची जागतिक वारसा म्हणून ‘यूनो’ ने नोंद घेतली असून यानिमित्ताने त्र्यंबकेश्वरची वेगळी ओळख जगासमोर आली आहे. ही यात्रा ‘निर्मल वारी’ होण्यासाठी शासनाने उपाययोजना केल्या आहेत. विविध संघटना, सामाजिक संस्थाच्या सहाय्याने यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पंढरपूर व आळंदी प्रमाणेच स्वच्छ निर्मल वारीचे काम येथेही झाले आहे.

यावेळी त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक, मंदिर संस्थानचे विश्वस्त मंडळ सदस्य, प्रमुख नागरीक, भाविक मोठ्या संख्येने होते.

सारशी येथील ठाकरे दाम्पत्याला दर्शनाचे पहिले मानकरी होण्याचा मान

शासकीय पुजेनंतर पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील सारशी येथील सौ.आरती व अनिल शंकर ठाकरे या दाम्पत्याला दर्शनाचे पहिले मानकरी होण्याचा मान मिळाला. मंत्रीमहोदयांच्या हस्ते ठाकरे दाम्पत्याचा व त्यानंतर दर्शन घेणारे भिवंडी तालुक्यातील सागाव येथील रुपाली व रघुनाथ पाटील दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा