महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
वंदेमातरम म्हणायचे तर.....! बुधवार, १३ सप्टेंबर, २०१७
पानाचा हा शौक अमीर उमरावापासून "आम" आदमीपर्यंत दिसतो. पान खाण्यात गैर नाही परंतु त्याची योग्य अशी विल्हेवाट लावणारी ‘पिकदाणी’ अतिशय महत्त्वाची ठरते.
"खईके पान बनारस वाला,
खुल जाये बंद अकल का ताला"

या अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या गाण्याने या पानाला तरुणाईमध्ये प्रतिष्ठा मिळाली. आता पान खाणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. मात्र दुर्दैवाने या पिढीला पान खाल्यानंतर काय खबरदारी घ्यायची याच भान नसल्याने गावागावात भिंती रंगायला लागल्या. पान खाऊन कुठेही पिचकारी मारणारे बहाद्दर कशाचाही विचार करीत नाही. बसमधून खिडकीतून मारलेली पिचकारी कुणाच्या अंगावर पडेल याच भान ठेवल जात नाही. यातून मग वादाचे प्रसंग, भांडण आणि मारामारी आणि थेट खूनापर्यंतचे गंभीर गुन्हे घडले आहेत पण लक्षात कोण घेतो.

इमारतीमध्ये जिन्याच्या कोपऱ्याची जागा ही खास पिचकारी मारण्याची जागा असल्याप्रमाणे सर्व इमारतीत कोपरे रंगायला लागले. याला वैतागून मग रहिवाशांनी ते कोपरे देवी - देवतांच्या तसबिरी असणाऱ्या टाईल्स लावल्यावर हे कोपरे पुन्हा चकचकीत झाले.

रस्त्यावरील झाडे, फुटपाथ यांचे निर्मीती मात्र केवळ पिचकारी झेलण्यासाठी झाली की काय अशी स्थिती आहे. याही पेक्षा भयंकर सत्य म्हणजे एसटी बस किंवा कारमधून पिचकारी मारणारे. दुचाकी वाहनधारक देखील काही वेगळे नाहीत. ही सारी मंडळी आपण कुणाला पिचकारीचा अभिषेक घालतोय हे यांच्या गावी देखील नसते आणि सर्रास पिचकाऱ्यांनी रस्ते व इतरांचे कपडे खराब करणे सुरू असते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी याबाबत केलेले विधान या सर्व पिचकारी बहाद्दरांच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारे आहे. आपण धरतीला मातेचा दर्जा देतो आणि तिचा गौरव करण्यासाठी वंदे मातरम म्हणतो. "सुजलाम, सुफलाम, मलयज - शितलाम सस्य शमलाम मातरम" अशी प्रार्थना करतो मग आपण त्याच भूमातेचा विचार न करता अशी पिचकारी टाकत असू तर आपणास वंदे मातरम म्हणण्याचा काहीच अधिकारी नाही हे प्रधानमंत्री मोदी यांचे म्हणणे अगदी योग्यच आहे.

विदेशी पर्यटकांनी या पानबहाद्दरांचा प्रताप बघून या देशातील माणस रक्त ओकतात असा प्रचार केला. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला हा सापांचा देश असाही प्रचार झाला. जागतिकीकरणात आता देशामध्ये खूप मोठे काम झाले. देश आता महासत्ता होण्याच्या तयारीत आहे. अशावेळी आपल्या देशाची ‘अस्वच्छ देश’ अशी ओळख पुसण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वत: हातात झाडू घेऊन स्वच्छ भारताची मुहूर्तमेढ रोवली.

येणाऱ्या काही दिवसात स्वच्छ भारत साठीचे पहिले पाऊल म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दिनी 2 ऑक्टोबर पर्यंत आपला महाराष्ट्र हागणदारी मुक्त होणार आहे मात्र या पानाच्या पिचकारीचं करायचं काय. देश आरोग्य संपन्न घडविण्यासाठी स्वच्छता अत्यंत मोलाची आहे. आणि ‘पिचकारी मुक्ती’ देखील यासाठी आवश्यक आहे. अमीर उमराव पान खाण्याचा ‘शौक’ ठेऊन होते. परंतू आपल्या या शौकामुळे समाजात अस्वच्छता होणार नाही याची काळजी घेत होते.

विदेशात रस्त्यावर थुंकलं तर 20 डॉलरचा दंड भरावा लागला अशा सुरस कहाण्या सांगितल्या जातात कारण त्या देशात सार्वजनिक ठिकाणी कुणीही पिचकारी मारत नाही. मारणारे हे तुम्ही आम्ही.... मग या पिचकारी बहाद्दरांनी आता तरी जागं व्हावं आणि देश ‘स्वच्छ भारत’ ओळखला जावा यासाठी आपलं योगदान द्यावं इतकीच अपेक्षा.

- प्रशांत अनंतराव दैठणकर
जिल्हा माहिती अधिकारी
गडचिरोली
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा