महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
सोशल मीडिया महामित्र उपक्रम समाजाला दिशा देण्यासाठी उपयुक्त - जिल्हाधिकारी वि. ना. काळम मंगळवार, १३ मार्च, २०१८
सोशल मीडिया महामित्र उपक्रमांतर्गत संवादसत्रास उत्स्‍फुर्त प्रतिसाद

सांगली :
वेळेबरोबर काळही बदलत असतो. जो काळाबरोबर बदलत असतो तोच समाजामध्ये टिकतो. सध्याच्या काळात सोशल मीडियाचा वापर अधिक होत आहे. याच सोशल मीडियाचा विवेकी पद्धतीने प्रभावी वापर केल्यास समाजाला उपयुक्त ठरेल. त्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने आयोजित केलेला सोशल मीडिया महामित्र उपक्रम शासनाच्या कल्याणकारी योजना समाजापर्यंत पोहोचण्यासाठी चांगला आहे. सोशल मीडिया महामित्र उपक्रम समाजाला दिशा देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी आज येथे केले.

जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आयोजित सोशल मीडिया महामित्र संकल्पनेंतर्गत संवादसत्र कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक सतीश लळीत, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, चंद्रकांत पवार, विशाल गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात हा कार्यक्रम झाला.

महामित्र मधील महा हा शब्द कायम रहावा व महा विचार पुढे जावा अशी अपेक्षा व्यक्त करून जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, सध्या सोशल मीडियाचा वापर वाढताना दिसत आहे. एखादा व्यक्ती किंवा घटनेची प्रतिमा तयार करण्याचे काम सोशल मीडिया करत असते. यामध्ये सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही बाबी असतात. या वापराला विधायक वळण देण्याची गरज ओळखून मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून सोशल मीडिया महामित्र हा उपक्रम घेण्यात आला. शासनाच्या कल्याणकारी योजना समाजापर्यंत जाण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त असून समाजामध्ये चांगले संदेश जावून विवेकी प्रवृत्ती वाढविण्यास आणि विधायक बाबी घडण्यासाठी मदत होणार आहे, असे ते म्हणाले.

सोशल मीडियाचा उपयोग विधायक कामासाठी व्हावा, अशी अपेक्षा करून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत म्हणाले, इंटरनेटच्या मायाजालात माहितीचा भडिमार होत असतो. या पार्श्वभूमिवर सोशल मीडियाचा वापर करताना काही मूल्यांचे भान बाळगणे गरजेचे आहे. यामध्ये सोशल मीडियावरील माहितीची सत्यता, उपयुक्तता यांची पडताळणी करूनच ती माहिती पुढे पाठवणे आवश्यक आहे. सोशल मीडियाचा सकारात्मक संदेश समाजात रूजवण्यासाठी वापर व्हावा. यासाठी काही तंत्र व मंत्र त्यांनी उपस्थितांना सांगितले.

यावेळी सोशल मीडिया महामित्र कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या संवादसत्रास परीक्षक म्हणून अपर जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण, उपजिल्हाधिकारी सर्वश्री अमृत नाटेकर, शंकरराव भोसले, उपजिल्हाधिकारी डॉ. स्मिता कुलकर्णी, जिल्हा उद्योग केंद्राच्या व्यवस्थापिका विद्या कुलकर्णी, जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) मिनाज मुल्ला हे शासकीय अधिकारी आणि सी. एस. कोटिभास्कर, समीर महाबळ, डॉ. प्रियदर्शन चितळे, देवानंद लोंढे, ऍ़ड. आनंद देशपांडे, आशिष गोसावी, नरोत्तम लाटा, चंद्रकांत पवार हे अशासकीय मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविकात कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक सतीश लळीत म्हणाले, आज समाज माध्यमांचा वापर वाढला असून हा वापर सकारात्मक आणि विधायक होणे आवश्यक आहे. विधायक संदेशातून विवेकी समाज घडविण्यासाठी प्रत्येकाने समाज माध्यमे वापरतांना समाजहिताची काळजी घेणे गरजेचे आहे. नेमके संदेश, छोट्या व्हिडिओ क्लिप आणि प्रमाणभाषा याचा अवलंब करणे आवश्यक आहे. माहिती आणि जनसंपर्क विभागाने संवादमित्र संकल्पनेतून विधायक संदेशाद्वारे विवेकी समाज घडविण्याचा हाती घेतलेला उपक्रम समाजहित आणि समाज विकासासाठी अतिशय उपयुक्त आहे.

यावेळी चंद्रकांत पवार तसेच सहभागी युवक-युवतींनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांनी स्वागत केले. विशाल गायकवाड यांनी आभार मानले.

यावेळी सहभागी युवक / युवतींना मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र वार्षिकी पुस्तक देऊन गौरविण्यात आले. तसेच राज्य शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाची एक वर्षाची वर्गणी भेट स्वरूपात देण्यात आली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा