महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
ओबीसी मुलींचे शासकीय वसतीगृह लवकरच साकारणार बुधवार, ०८ ऑगस्ट, २०१८
पालकमंत्र्यांचा पाठपुरावा, प्रस्ताव केंद्राकडे

यवतमाळ :
जिल्हा स्तरावर इतर मागास प्रवर्गातील मुलींसाठी नवीन वसतीगृह बांधकाम करण्याकरीता जागा मंजूर झाली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांच्या पाठपुराव्यामुळे उमरसरा येथे 4 हजार चौरस मीटर जागेवर नवीन वसतीगृह साकारणार आहे. वसतीगृहासाठी 90 टक्के निधी केंद्र शासनाकडून मिळणार असल्याने अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव केंद्राकडे सादर करण्यात आला असून मंजुरासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे.

सामाजिक न्याय विभागातर्फे विजाभज, विमाप्र व इमाव प्रवर्गाच्या मुलींसाठी तसेच वर्किंग वुमनसाठी नवीन शासकीय वसतीगृह बांधण्याकरीता जागेची मागणी करण्यात आली होती. या वसतीगृहासाठी उमरसरा येथील शिट क्रमांक 52 ए, प्लॉट क्रमांक 1 मधील 0.40 आर. क्षे. (4000 चौ.मी) जागा हस्तांतरीत करण्यात येणार आहे. यासाठी तहसीलदार यवतमाळ, उपविभागीय अधिकारी यवतमाळ, उपअधिक्षक भुमिअभिलेख, सार्वजनिक बांधकाम विभाग, सहायक संचालक, नगर रचना, उपवनसंरक्षक, कार्यकारी अभियंता, स्थानिक प्राधिकरण विभाग, नगर परिषद यांचे अभिप्राय मागविण्यात आले होते. ओबीसी मुलींच्या शासकीय वसतीगृहासाठी सदर जमीन हस्तांतरीत करण्यास कोणताही आक्षेप नसल्याचे संबंधित विभागांनी कळविले आहे. वसतीगृहासाठी 90 टक्के निधी केंद्र शासन व 10 टक्के निधी राज्य शासनाकडून उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सदरच्या प्रस्तावाला केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर वसतीगृह सुरू होणार आहे.

मुलींच्या या शासकीय वसतीगृहामुळे जिल्ह्यातील विजाभज, विमाप्र व इमाव प्रवर्गाच्या मुलींना आणि वर्किंग वुमन यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा