महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन जलयुक्तची कामे करा - संजय राठोड गुरुवार, २० एप्रिल, २०१७
  • जलयुक्त शिवारच्या कामांचा आढावा
  • पारदर्शकतेसाठी ई-निविदेचे निर्देश
  • कामांची गुणवत्ता राखण्याच्या सुचना

यवतमाळ : जलयुक्त शिवार अभियान राज्य शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. गेल्यावर्षी झालेल्या कामातून दृष्यपरिणाम दिसून आले आहे. यावर्षीही कामे करतांना गुणवत्ता राखण्यासोबतच पारदर्शकतेसाठी ई-निविदेद्वारे कामे करा. गावांची निवड तसेच कामे ठरवितांना आपल्या क्षेत्रातील लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या. यामुळे आवश्यक त्या ठिकाणी कामे घेण्यासोबतच गुणवत्ता राखण्यास मदत होईल, असे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

विश्रामभवन येथे श्री.राठोड यांनी दारव्हा, दिग्रस व नेर या तालुक्यातील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गेल्या दोन वर्षात प्रस्तावित, झालेली, सुरु असलेली व नव्याने करावयाच्या कामांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, उपविभागीय कृषी अधिकारी कैलाश वानखडे, आत्माचे कृषी अधिकारी श्री.काळे यांच्यासह तीनही तालुक्यातील कृषी अधिकारी उपस्थित होते.

ज्या ठिकाणी कामांची आवश्यकता आहे अशा ठिकाणी प्राधान्याने कामे घेण्यात यावी. घेतलेली कामे चांगल्या पद्धतीने कालमर्यादेत पूर्ण होणे आवश्यक आहे. मजूर सोसायटी किंवा सुशिक्षीत बेरोजगारांना कामे वाटप करतांना शासकीय निर्देशांचे पालन होणे आवश्यक आहे. मजूर सोसायटीला दिलेली कामे सोसायटीअंतर्गत मजूरांकडूनच होतात किंवा इतर व्यक्तींकडून केले जाते यावरही सहकार विभाग व संबंधीत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष ठेऊन काम गुणवत्तापूर्वक करून घेणे आवश्यक आहे.

कामाचा दर्जा महत्वाचा आहे. कुणाला काम देण्याच्या भावनेतून कामांचे तुकडे करू नका. उलट काही कामे एकत्र करून कामांच्या ई-निविदा करा. कामे वाटपाची कार्यवाही पारदर्शकपणे झाली पाहिजे. यात चुकीची भुमिका स्वीकारल्यास संबंधीत अधिकाऱ्यांना उत्तरे द्यावे लागतील. शिवाय कामांचा दर्जा तपासणीसाठी तिऱ्हाईत व्यक्तींकडून पाहणी केली जाईल, असेही महसूल राज्यमंत्र्यांनी सांगितले. तीन तालुक्यांमध्ये आतापर्यंत अभियानांतर्गत कोणती कामे करण्यात आली, त्या कामांची गावनिहाय यादी, कामनिहाय झालेल्या खर्चाचे अहवालही सादर करण्याचे निर्देश श्री.राठोड यांनी संबंधीत कृषी अधिकाऱ्यांना दिले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा