महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांचा सर्व्हे डिसेंबरअखेर पूर्ण करावा - पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर रविवार, ०३ डिसेंबर, २०१७
लातूर :- जिल्ह्याच्या प्रत्येक गावातील दिव्यांग व्यक्तींचा सर्व्हे करून त्यांची सविस्तर माहिती घेऊन डेटा तयार करावा. या कामात हलगर्जीपणा झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश कामगार कल्याण, कौशल्य विकास मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिले.

संवेदना बहुविकलांग मुलांची शाळा, हरंगुळ ता. लातूर येथे आयोजित अपंग कल्याण निधी समितीच्या बैठकीत पालकमंत्री निलंगेकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा नियोजन अधिकारी संजय कोलगणे, जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखाधिकारी श्री. निमकर, अशासकीय सदस्य पंडीत पाटील, ॲड. जगन्नाथ चिथाडे आदि उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. निलंगेकर म्हणाले की, समाज कल्याण विभागाने प्रत्येक गावातील दिव्यांग व्यक्तींची सविस्तर माहिती संकलित करण्यासाठी गावागावांत गेले पाहिजे. तसेच प्रशासनाने याकरिता ग्रामसभा घेऊन दिव्यांगांची माहिती संकलित करावी असे त्यांनी सांगितले.

सद्यस्थितीमध्ये दिव्यांग व्यक्तींना ज्या संस्थेकडून प्रशिक्षण दिले जात आहे त्याच संस्थांना पुढील काळात प्रशिक्षण केंद्र म्हणून मान्यता द्यावी, असे निलंगेकर स्पष्ट केले. तसेच समाजाने दिव्यांगाना सर्व सामान्य माणसांप्रमाणेच सन्मानाची व आदराची वागणूक द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

राज्य शासनाने दिव्यांगांसाठी प्रत्येक विभागांने 3 टक्के निधी खर्चाकरिता नियंत्रण ठेवण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठित करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार राज्यात फक्त 4 जिल्ह्यात समिती स्थापन झाली असून त्या समितीची पहिली बैठक ही लातूर जिल्ह्याने घेतली असल्याची माहिती श्री. निलंगेकर यांनी दिली. तसेच प्रत्येक विभागाने दिव्यांगांसाठी असलेला निधी वेळेत व त्यांच्यासाठीच खर्च करण्याचे निर्देश दिले.

जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिव्यांगांसाठी प्रत्येक विभागाकडे असलेल्या निधीतील 3 टक्के निधी खर्च केला जाईल. त्याप्रमाणे पालकमंत्री महोदयांनी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने काटेकोरपणे कार्यवाही केली येईल, असे सांगितले. तसेच प्रत्येक विभागाने दिव्यांग कल्याण योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याची सूचना जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी केली.

दिव्यांगांचा सत्कार:-
3 डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाच्या औचित्य साधून जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग व संवेदना सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने संवेदना बहुविकलांग मुलांची शाळा, हरंगुळ (बु.) येथे जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व दिव्यांग व्यक्तींचा सत्कार पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलींद लातूरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, समाज कल्याण सभापती संजय दोरवे, संवेदना सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्राचे अध्यक्ष प्र.मा. जोशी, तसेच अपंग प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थी/ विद्यार्थिनी, विद्यार्थ्यांचे पालक, दिव्यांग व्यक्ती, नागरिक उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा