महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जलयुक्‍त शिवार अभियानाच्‍या माध्‍यमातून अहमदनगर जिल्‍हा पाणीदार होईल - डॉ. राजेंद्र सिंह गुरुवार, ०८ फेब्रुवारी, २०१८
जलसाक्षरता केंद्रातर्गत जलनायक, जलदूत कार्यशाळेत मार्गदर्शन

अहमदनगर :
जलयुक्‍त शिवार अभियानाच्‍या माध्‍यमातून महाराष्‍ट्र शासनाने राज्‍यात अतिशय उत्तम काम केले आहे. जनतेला पाण्‍याबाबतीत जलसाक्षर करण्‍याचे कामही कौतुकास्‍पद असून पडणारा पाऊस, पाण्‍याचे नियोजन, योग्‍य वापर, काटकसर,पीक पद्धतीचा अवलंब या बाबी महत्‍वाच्‍या असल्‍याचे सांगतानाच यातूनच अहमदनगर जिल्‍हा पाणीदार होण्‍यास मदत होईल, असा विश्‍वास जलबिरादरी प्रकल्‍पाचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष डॉ.राजेंद्र सिंह यांनी आज येथे व्‍यक्‍त केला.

जिल्‍हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जलसाक्षरता केंद्रातर्गत जलनायक, जलदूत यांच्‍या कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्‍हणून श्री सिंह बोलत होते. जिल्‍हाधिकारी अभय महाजन अध्‍यक्षस्‍थानी उपस्थित होते. यावेळी जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने, उपजिल्‍हाधिकारी वामन कदम, जिल्‍हा परिषदेचे अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्‍हे, जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडीत लोणारे, कार्यकारी अभियता मोरे, यशदाचे आनंद कुशावळे, सुमंत पांडे आदी उपस्थित होते.

जलयुक्‍त शिवार अभियानाचे कौतुक करुन श्री.सिंह म्‍हणाले राज्‍यात जलयुक्‍तचे उत्‍तम काम झाले आहे. नागरिकांना पाण्‍याबाबतीत साक्षर करण्‍याचे कामही सुरु आहे. शाश्‍वत विकासासाठी या बाबी महत्‍वाच्‍या आहेत. यातूनच राज्‍यासोबत अहमदनगर जिल्‍हाही पाणीदार होईल पाण्‍याच्‍या बाबतीत आपल्‍याला पडणारा पाऊस, योग्‍य वापर, पाण्‍याचा काटकसरीने वापर, पाण्‍याच्‍या उपलब्‍धतेनुसार पीक पद्धती या बाबी विचारात घ्‍याव्‍या लागतील. यामध्‍ये लोकसहभाग महत्‍वाचा ठरणार आहे. जिल्‍ह्याला पाणीदार बनविण्‍यासाठी प्रत्‍येकाने आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्‍यांनी केले.

राजस्‍थानमध्‍ये 11 हजार 800 छोटे बांध आम्‍ही बांधले आहेत. त्‍यामुळे त्‍या बंधाऱ्‍यात पाण्‍याची उपलब्‍धी आहे. गावातून शहराकडे होणारे स्‍थलांतर थांबले आहे व स्‍थलांतरीत झालेले कुटुंब पुन्‍हा गावात परतले आहेत. या कामामुळे सामान्‍य माणसाच्‍या चेहऱ्‍यावर आनंद दिसतो आहे. वाहून जाणारे पाणी व माती अडविणे गरजचे असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

जिल्‍हाधिकारी अभय महाजन म्‍हणाले, अहमदनगर जिल्‍ह्यात जलयुक्‍त शिवार अभियानाच्‍या माध्‍यमातून मोठ्याप्रमाणात कामे झाली आहेत. यामध्‍ये लोकसहभाग महत्‍वाचा ठरला असून या कामामुळेच भूजल पातळीत वाढ झाली आहे. पाण्‍याची गरज, साठा, वापर या जबाबदारीमध्‍ये प्रत्‍येकाचे योगदान महत्‍वाचे ठरणार आहे. जिल्‍हा परिषदेच्‍या शाळेमधूनही पाण्‍याबाबतीत विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन केले जाणार असल्‍याचे श्री.महाजन यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्‍ह्यातील प्रत्‍येक तालुक्‍यातून आलेले जलदूत, जलनायक उपस्थित होते. आभार उपजिल्‍हाधिकारी वामन कदम यांनी मानले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा