महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
खाजगी रुग्णालयांना सीपीआर दर्जेदार पर्याय ठरावे - पालकमंत्री चंद्रकांत पाटील शुक्रवार, १९ मे, २०१७
कोल्हापूर : केवळ सरकारी निधीतून सर्व सुधारणा होतील ही अपेक्षा बदलून सुधारणांसाठी जनसहभाग वाढला पाहिजे, असे सांगून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाची प्रतिमा हळूहळू बदलत आहे याचा मनस्वी आनंद होत असून खाजगी रुग्णालयांना दर्जेदार पर्याय म्हणून सीपीआरची प्रतिमा वृद्धींगत व्हावी, अशी भावना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

श्री श्री रवीशंकर यांच्या जन्मदिनानिमित्त छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात लोकसहभागातून रुग्णांच्या सोईसाठी अद्ययावत 61 बेड प्रदान करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. याप्रसंगी आमदार अमल महाडिक, आर्ट ऑफ लिविंगचे स्वामी संतोषजी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ.शिशिर निरगुंडे, जयेश ओसवाल, संदिप देसाई, विजय जाधव, गणेश जाधव, संतोष लाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

खाजगी रुग्णालयांना दर्जेदार पर्याय म्हणून सीपीआर उभे राहिले पाहिजेत. सर्वच आर्थिक स्तरातील रुग्णांची सीपीआरला पहिली पसंती असावी इतकी या रुग्णालयाची प्रतिमा उंचावणे आवश्यक असल्याचे सांगून, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बदल हवा असेल तर संपूर्ण शासकीय निधीवरची भिस्त कमी करुन लोकसहभाग वाढविला पाहिजे. त्यादृष्टीने आर्ट ऑफ लिविंग संस्थेच्या माध्यमातून चांगल्या दर्जाचे बेड उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांनी संस्थेचे आभार मानले. यावेळी सीपीआरने आपल्या गरजा प्रभावीपणे मांडाव्यात, त्यासाठी त्यांना आवश्यक तो सर्व निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे सांगून स्वच्छता व वातावरण अल्हाददायक ठेवल्यास रुग्णांना औषधोपचाराबरोबरच चांगल्या वातावरणाचाही लाभ मिळून रुग्ण लवकर बरा होईल, असे सांगितले. यावेळी त्यांनी हृदय शस्त्रक्रिया विभागातील मशिनरी महिनाभर बंद असणे ही बाब अत्यंत खेदजनक असून सीपीआर प्रशासनाने अशा बाबी वेळीच निदर्शनास आणून दिल्या पाहिजेत, असे सांगितले.

याप्रसंगी इंटेन्सिव्ह केअरमध्ये चेअर उपलब्ध करुन दिल्याबद्दल आमदार अमल महाडिक यांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदन केले. तसेच ॲटो ब्लड गॅस ॲनालायझर ही साडेसहा लाख रुपये किमतीची हृदय शस्त्रक्रिया विभागातील मशिनरी आमदार अमल महाडिक आणि गांधीनगरचे व्यापारी शंकर दुराणी यांनी उपलब्ध करुन दिल्याबद्दल दोघांचे आभार मानले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा