महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
नैसर्गीक आपत्तीमध्ये शासन शेतकऱ्यांसोबत आहे - पालकमंत्री रविवार, १९ मार्च, २०१७
लातूर : जिल्ह्यात दिनांक 15 मार्च 2017 रोजी झालेल्या वादळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे फार मोठे नुकसान झालेले आहे. अशा या नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीमध्ये शासन पूर्णपणे शेतकऱ्यांसोबत आहे. प्रशासनाकडून पंचनामे सुरु आहे. अशी माहिती कौशल्य विकास, कामगार कल्याणमंत्री तथा पालकमंत्री श्री. संभाजी पाटील-निलंगेकर यांनी दिली.

औसा तालुक्यातील येलुरी व वरवडा या गावांमधील शेती पिकांची पाहणी प्रसंगी श्री. निलंगेकर शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. यावेळी खासदार रावसाहेब दानवे, आमदार विनायक पाटील, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रतापसिंह कदम, उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, रामेश्वर रोडगे, उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. मोरे, तहसीलदार अहिल्या गाठाळ, गट विकास अधिकारी तुकाराम भालके यांच्यासह महसूल व कृषि विभागाचे अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. निलंगेकर म्हणाले की, गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. तसेच द्राक्ष फळपीक हे हवामान आधारित फळपीक योजनेत येत नसल्याने द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीकरिता शासनाकडून कशाप्रकारे मदत मिळेल यासाठी प्रयत्न केला जाईल.

जिल्ह्यातील औसा व लातूर तालुक्यात वादळीपाऊस व गारपीट झाल्यानंतर लगेच प्रशासनाकडून तातडीने पिक नुकसानीचे पंचनामे सुरु झालेले असून या पंचनाम्यातून एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आल्याचे श्री. निलंगेकर यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री श्री. निलंगेकर यांनी येलुरी व वरवडा येथील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन गारपिटीने झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यामध्ये ज्वारी, गहू, हरभरा, द्राक्ष, डाळींब, ऊस, टोमॅटो, कोबी आदी पिकांचा समावेश आहे.

जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. कदम यांनी गारपिटीमुळे औसा व लातूर तालुक्यातील प्राथमिक अंदाजानुसार एकूण 28 हजार 256 हेक्टर क्षेत्रावरील गहू, हरभरा, ज्वारी, द्राक्ष आदि पिकांचे नुकसान झाल्याची माहिती दिली. यामध्ये औसा तालुक्यातील 48 गावांमधील 22 हजार 338 हेक्टर क्षेत्रावरील पिके तर लातूर तालुक्यातील 26 गावांमधील 5 हजार 916 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा समावेश असल्याची त्यांनी सांगितले.

यावेळी प्रशासनाच्या वतीने वादळी पाऊस व गारपिटीने पशुधन दगावल्यामुळे येलुरी येथील ग्रामस्थ श्री. रुद्राप्पा गुराप्पा बिराजदार यांना पालकमंत्री श्री. निलंगेकर यांच्या हस्ते 16 हजाराचा धनादेश देण्यात आला. येलुरी व वरवडा येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पालकमंत्री श्री. निलंगेकर यांच्याकडे पिकांच्या नुकसानीबद्दल शासनाकडून जास्तीत जास्त मदत लवकर मिळावी ही मागणी करण्यात आली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा