महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
ग्रामीण भागात कोरोनाशी दोन हात करण्यासाठी अंगणवाडी सेविका, तलाठी, ग्रामसेवकही देत आहेत योगदान गुरुवार, २६ मार्च, २०२०

बीड :
कोरोना या जीवघेण्या साथीवर वेळीच नियंत्रण आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहे. सारा देश लॉकडाऊन करण्यात आला असला तरी मागील काही दिवसात पुणे-मुंबई व इतर शहरात वास्तव्यास असलेले लोक आपल्या गावी परतले आहेत. या लोकांच्या नोंदी ठेवणे, संशयितांचे होम कॉरन्टाईन करणे, शासन-प्रशासनाला माहिती कळवणे आदी कोरोनाशी दोन हात करण्याच्या कामामध्ये अंगणवाडी सेविका तसेच तलाठी आणि ग्रामसेवक महत्त्वाची भूमिका निभावत आहेत.

शासनाच्या बहुतांश योजना आणि उपक्रमांमध्ये अंगणवाडी सेविका ह्या सातत्याने योगदान देतात. दोन महिन्यांपुर्वी चीन येथे कोरोना व्हायसची साथ पसरल्यानंतर भारतात सर्वप्रथम केरळ येथे कोरोनाचा रूग्ण आढळून आला. यानंतर महाराष्ट्रात पुणे येथे कोरोनाचा रूग्ण आढळल्यानंतर महाराष्ट्र सरकारने तातडीने पावले उचलत शाळा, महाविद्यालये, सरकारी, खाजगी कार्यालये, कंपन्या, कारखाने, बस, रेल्वे, विमान आदी सर्व सेवा बंद केल्या. एवढ्यावरच न थांबता सारा महाराष्ट्र लॉक डाऊन करत १४४ कलम लागू केले. दरम्यान महाराष्ट्र लॉकडाऊन करण्यापुर्वीच पुणे-मुंबई व इतर शहरात उद्योग, व्यवसाय, नोकरी व काम-धंद्याच्या निमित्ताने वास्तव्यास असलेले बहुतांश लोक ग्रामीण भागातील आपल्या गावी परतले होते. या गावी आलेल्या लोकांपैकी एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असू नये अन असलीच तर त्याच्यापासून इतरांना कोरोनाची लागन होऊ नये याची काळजी जिल्हा प्रशासनाने घेतली. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी गाव पातळीवर स्थलांतरित लोकांच्या नोंदी घेणे, कोणाला लक्षणे आहेत का? याची माहिती घेणे, ज्यांच्यात लक्षणे आढळतील त्यांना होम कॉरन्टाईन करणे ही कामे करण्यासाठी अंगणवाडी सेविका तसेच तलाठी, ग्रामसेवक हे जिल्हा प्रशासनाला मोलाची मदत करत आहेत.

गाव पातळीवर कोरोनाशी लढणार्याे अशा, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे देखील कौतुक झाले पाहिजे. कारण सध्या ग्रामीण भागात त्या कोरोनाशी दोन हात करत आहेत.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा