महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
ओडिशा व महाराष्ट्राची सांस्कृतिक वीण घट्ट- सह आयुक्त रिना महापात्रा मंगळवार, ०५ डिसेंबर, २०१७
नवी दिल्ली : महाराष्ट्र सदनातील ‘ओडिशा अन्न महोत्सव’ आणि यापूर्वी ओडिशा भवनात झालेल्या ‘महाराष्ट्र अन्न महोत्सवा’च्या माध्यमातून उभय राज्यांमध्ये सांस्कृतिक आदान-प्रदान होऊन सांस्कृतिक वीण घट्ट झाली, अशा भावना दिल्ली स्थित ओडिशा भवनाच्या सह निवासी आयुक्त रिना महापात्रा यांनी व्यक्त केल्या.

एक भारत श्रेष्ठ भारत’ संकल्पनेअंतर्गत येथील कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनामध्ये आयोजित ओडिशा अन्न महोत्सवात खवय्यांनी आज माछा बेसर, चिकन करी, घांटा तरकारी आदी उडिया खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. याप्रसंगी श्रीमती महापात्रा बोलत होत्या. उडिया खाद्यपदार्थांचा स्वाद हा मुख्यत्वे गोड आहे तर महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ हे झणझणीत आहेत. मात्र, भिन्न खाद्य संस्कृतीतून मनामनाला जोडणारा एक सांस्कृतिक धागा हे दोन्ही राज्यांतील समान तत्व आहे. या अन्न महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि ओडिशा या राज्यांमध्ये सांस्कृतिक आदान-प्रदान होऊन नात्यांची वीण घट्ट झाल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र सदनाच्या उपहारगृहात आज ओडिशा अन्न महोत्सवाचे उद्घाटन ओडिशा भवनाचे निवासी आयुक्त संजिव मिश्रा आणि सचिव तथा महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आभा शुक्ला, गुतंवणूक व राजशिष्टाचार आयुक्त लोकेशचंद्र, सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, ओडिशा भवनाच्या सह निवासी आयुक्त रिना महापात्रा यांनी दीपप्रज्वलनाने केले.

या अन्न महोत्सवात खवय्यांसाठी खास ओडिशाचे खाद्यपदार्थ उपलब्ध करण्यात आले. दही बैंगन, बडी चुरा, चाकुली पिठा, दालमा, घांटा तरकारी, उडिया भात या शाकाहारी खाद्यपदार्थांसह माच्छा बेसरा, चिकन करी या मांसाहारी पदार्थ आणि चेन्नापोडा व रसगुल्लाही मिष्ठान्नांचा खवय्यांनी आस्वाद घेतला.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ ही योजना केंद्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने राबविण्यात येत आहे. देशातील राज्या-राज्यांमधील दुरावा कमी होऊन सांस्कृतिक आदान-प्रदानाच्या माध्यमातून संबंध दृढ व्हावे हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे. देशातील २९ राज्य आणि ७ केंद्रशासित प्रदेशांमध्ये असा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. दिल्ली स्थित विविध राज्यांच्या भवनांमध्येही या कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र आणि ओडिशा या राज्यांतील खाद्य संस्कृतीची देवाण घेवाण होण्याच्या उद्देशाने २१ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील ओडिशा भवन येथे महाराष्ट्र अन्न महोत्सव साजरा करण्यात आला.

महाराष्ट्र सदनात आयोजित ओडिशा अन्न महोत्सवात केंद्रीय संरक्षण मंत्रालयाचे अपर सचिव अपूर्व चंद्रा, निवृत्त सनदी अधिकारी ए.के.मगो आणि अजय दुआ यांच्यासह, दिल्ली स्थित महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी, दिल्ली स्थित विविध राज्यांच्या निवासी आयुक्त कार्यालयातील अधिकारी , प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा