महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
हातमाग विणकरांनी नाविन्यतेचा ध्यास घ्यावा- शोभा बनशेट्टी सोमवार, २० मार्च, २०१७
सोलापूर : वस्त्रोद्योग दुनियेतील दिवसेंदिवस होत जाणाऱ्या बदलांचा अभ्यास करुन शहरातील हातमाग विणकरांनी नाविन्यतेचा ध्यास घेवून ही कला जोपासावी आणि सोलापूरचा नावलौकिक वाढवावा, असे प्रतिपादन महापौर शोभा बनशेट्टी यांनी केले.

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागातर्फे विभागीय हातमाग कापड स्पर्धेचे आयोजन डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात करण्यात आले होते. याच्या पारितोषिक वितरणप्रसंगी त्या बोलत होत्या.

श्रीमती बनशेट्टी म्हणाल्या, जिल्ह्याला हातमाग-विणकर कारागिरांची उज्ज्वल परंपरा आहे. या कारागिरांना अधिक सोयीसुविधा मिळाव्यात. यासाठी यंदा महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये काही तरतूद करता येईल का हे पाहण्यात येईल.

नगरसेवक नागेश वल्याळ यांनी या कलेला शासनाने अधिक प्रोत्साहन द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

वस्त्रोद्योग क्षेत्रातील भारताच्या प्राचीन कलांचा वारसा जतन करण्याच्या दृष्टीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत एकूण 255 विविध कला प्रकारांचा समावेश करण्यात आल्याची माहिती वस्त्रोद्योग विभागाचे प्रादेशिक उपसंचालक किरण सोनवणे यांनी सांगितले.

या स्पर्धेत शिवराज मोने आणि तुळशीदास पोतू यांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला. राजेंद्र अंकम व श्रीनिवास जिंदम यांना व्दितीय (विभागून) तर लढ्ढय्या वडेपल्ली, विनोद रुपनर, श्रीनिवास बिडवे यांना तृतीय क्रमांक (विभागुन) देण्यात आला.

यावेळी जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव, विणकर सेवा केंद्र (मुंबई)चे उपसंचालक आर.एम. परमार, नगरसेवक अविनाश बोमड्याल, सहाय्यक संचालक विजय रणपिसे, वैशाली साळवे यांच्यासह हातमाग-विणकर संस्थेचे इतर पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

तत्पूर्वी सकाळी महापौर शोभा बनशेट्टी, उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी, प्रादेशिक उपसंचालक किरण सोनवणे, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत, विणकर उपसंचालक आर.एम.परमार, शासकीय तंत्रनिकेतनचे वस्त्रोद्योग विभागाचे प्रमुख एम.एस.दंडोती, सहाय्यक संचालक विजय रणपिसे यांच्या परीक्षण मंडळाने स्पर्धकांनी सादर केलेल्या रेशीम साड्या, वॉल हँगिंग, टॉवेल आणि इतर उत्पादनाची पाहणी केली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा