महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी कृषि महोत्सव महत्त्वाचे - सहकारमंत्री सुभाष देशमुख रविवार, ११ मार्च, २०१८
कृषि महोत्सवाचे होम मैदानावर उद्घाटन

सोलापूर :
शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी कृषि महोत्सव महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास आज सहकार, पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी येथे व्यक्त केला.

राज्य शासनाच्या कृषि विभागाच्यावतीने आज होम मैदान येथे जिल्हा कृषि महोत्सवाचे उद्घाटन श्री. देशमुख यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होत. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, महापौर शोभा बनशेट्टी, कृषी सभापती मल्लिकार्जून पाटील, विरोधी पक्षनेते आनंद तानवडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, कॅप्टन प्रतापसिंह परदेशी, बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक शशिकांत भावसार आदी उपस्थित होते.

श्री देशमुख म्हणाले, ‘राज्य शासन तसेच केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी विविध योजना राबवत आहे. निर्णय घेत आहे. कृषि महोत्सवाचे आयोजन या धोरणाचा भाग आहे. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा आणि ग्राहकाला योग्य भावात शेतमाल मिळावा यासाठी कृषि महोत्सव एक समान व्यासपीठ ठरेल. या महोत्सवात विविध तंत्रज्ञानाचे स्टॉल आहेत. शेतीतील नवीन तंत्रज्ञान आणि आधुनिक यंत्रसामग्रीची शेतकऱ्यांना माहिती व्हावी यासाठी हा महोत्सव उपयोगी ठरेल’

जलयुक्त शिवार अभियान, शेततळे, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, समूह शेती, अशा विविध योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी आपल्या जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या जीवनात समृध्दी यावी, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवावे, यासाठी राज्य शासनाचे प्राधान्य आहे, असेही श्री. देशमुख म्हणाले.

प्रास्ताविकात डॉ. राजेंद्र भोसले यांनी शासनाच्या कामाचा लेखाजोखा मांडला. शेती उत्तम, मध्यम व्यापार, कनिष्ठ शेती असे चित्र भारतात पूर्वी होते. मात्र गेल्या काही काळापासून परिस्थिती बदलू लागली होती. मात्र सरकारच्या विविध योजनांमुळे पुन्हा शेतीला ऊर्जा मिळेल, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीला प्राधान्य दिल्यास त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. समाजातील प्रयोगशील शेतकरी शेतीमध्ये अनेक आदर्श घालून देत आहेत. येत्या चार दिवसात कृषि महोत्सवात शासनाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना मिळेल, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले.

तत्पूर्वी कृषि महोत्सवाचे उद्घाटन झाले. तसेच शेतीच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांना पुरस्कार देण्यात आले. कृषि महोत्सव 11 ते 15 मार्चदरम्यान रोज सकाळी 11 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुला असणार आहे. यात विविध प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. यामध्ये शासकीय योजनांची माहिती देणारे, नवनवीन प्रयोग करणारे शेतकरी, धान्ये, कडधान्ये, फळे, भाजी त्याचबरोबर शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या विविध कृषि निविष्ठांच्या कंपन्यांचे स्टॉल यांचा समावेश आहे. तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीच्या दृष्टीकोनातून विविध चर्चासत्रे व व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले तर आभार जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बसवराज बिराजदार यांनी मानले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी चंद्रकांत शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, आत्माचे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत, प्रकल्प व्यवस्थापक रवींद्र माने आदी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा