महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
वाचन संस्कृती संवर्धनात ग्रंथालयांची भूमिका मोलाची- गुलाबराव पाटील सोमवार, २० मार्च, २०१७
नशीराबाद सार्वजनिक ग्रंथालयाचा शतकपूर्ती महोत्सव

जळगाव
: ग्रंथांचे माणसाच्या आयुष्यात मोठे महत्त्व आहे. ग्रंथांच्या वाचनानेच माणसाचा व्यक्तिमत्व विकास होऊन तो आपल्या आयुष्यात प्रगती करु शकतो. आजच्या संगणकाच्या युगात वाचन आणि लेखन संस्कृती संवर्धन करण्यात ग्रंथालयांची मोलाची भूमिका आहे, असे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

नशीराबाद येथे सार्वजनिक ग्रंथालयाच्या शतकपूर्ती महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नाशिक विभाग ग्रंथालय संघाचे 18 वे अधिवेशनही आयोजित करण्यात आले होते. नशीराबाद येथील सर्वोदय विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अनिल बोरगमवार होते. अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष पी.पी. पाटील हे होते. यावेळी सहाय्यक ग्रंथालय संचालक नाशिक विभाग आशिष ढाके, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय बनसोड, सुभाष मुंढे, संजय म्हस्के, संतोष जाधव, सचिन मुळे आदी उपस्थित होते. यावेळी एका स्मरणिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

श्री.पाटील म्हणाले की, सार्वजनिक ग्रंथालयांचे समाजातील महत्त्व खूप मोलाचे आहे. समाजाचा सुज्ञ नागरिक घडविण्यासाठी ही ग्रंथालये मोलाचे योगदान देतात. सार्वजनिक ग्रंथालयांच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत शासन सकारात्मक असून त्या सोडविण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करु.

स्वागताध्यक्ष पी.पी. पाटील यांनी आपल्या स्वागतपर भाषणात नशिराबाद सार्वजनिक ग्रंथालयाचा इतिहास मांडला. प्रास्ताविक प्रा. अरुण पाटील यांनी तर सूत्रसंचालन बी.आर. खंडारे यांनी केले. या कार्यक्रमाला नाशिक विभागातील सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी, तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा