महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
सार्वजनिक गणेशोत्सवाचा उपयोग सुराज्य निर्मितीसाठी करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवार, १२ ऑगस्ट, २०१७
पुणे दि. १२ : लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून भारतीय समाजातील मरगळ झटकून समाज मनात विजिगिषुवृत्ती निर्माण केली. लोकमान्यांनी गणेशोत्सवाचा उपयोग स्वराज्य निर्मितीसाठी केला. आपण सर्वांनी मिळून गणेशोत्सवाचा उपयोग सुराज्य निर्मितीसाठी करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

येथील शनिवारवाडा पटांगणात पुणे महानगरपालिकेतर्फे आयोजित शतकोत्तर रौप्य महोत्सवी सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त विविध उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती विशाल चोरडिया, महापौर मुक्ता टिळक, खासदार संजय काकडे, आमदार माधुरी मिसाळ, आमदार सर्वश्री योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, विजय काळे, भीमराव तापकीर, अनिल भोसले, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, जिल्हाधिकारी सौरभ राव उपस्थित होते.

श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्वातंत्र्य संग्राम चिरडण्याचे काम इंग्रजांनी केले. इंग्रजांच्या या दडपशाहीमुळे भारतीय समाजमनात मरगळ आली होती. भारतीय समाज हा उत्सव प्रिय असून या उत्सवाची ऊर्जा स्वराज्य निर्मितीसाठी करण्याचे लोकमान्य टिळकांनी ठरविले. यासाठी घरगुती गणेशोत्सवाला त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचे रूप दिले. या निमित्ताने खंडित असणारा भारतीय समाज जोडला गेला. त्यामुळे स्वराज्य निर्मितीला बळ मिळाले.

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नाही तर हा सामाजिक उत्सव आहे. समाजाला एकत्र आणण्यासाठी हा उत्सव उपयुक्त आहे. सन २०२२ पर्यंत नवभारत घडविण्याचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व भारतीयांना केले आहे. भ्रष्टाचार, अशिक्षितता व अस्वच्छतेला २०२२ पर्यंत भारतातून हद्दपार करावयाचे आहे. प्रत्येकाने समाजासाठी, देशासाठी किमान दहा गोष्टींचा संकल्प मनात करावा. या संकल्पाच्या माध्यमातून नवभारत घडविण्याच्या प्रक्रियेत सक्रीय होण्याचे आवाहन त्यांनी केले.

पालकमंत्री श्री. गिरीश बापट म्हणाले, गणेशोत्सव हा कोणत्याही एका जाती धर्माचा नाही, तो सर्वांचा आहे. समाजाला जोडण्याचे काम गणेशोत्सवाच्या माध्यमातून घडते. हा केवळ उत्सव नाही, तर सगळ्यांवर संस्कार करणारी चळवळ आहे. गणेशोत्सवामुळे अनेक सामाजिक, राजकीय कार्यकर्ते घडले. या गणेशोत्सवाला सामाजिक जाणिवेची जोड देऊ.

महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, भारतीय समाज मनात ऐक्य आणण्यासाठी लोकमान्यांनी गणेशोत्सव सुरु केला. सव्वाशे वर्षांपूर्वी हा एक सोशल इंजिनीअररिंगचा यशस्वी प्रयत्न होता. लोकमान्यांनी घालून दिलेल्या चतु:सूत्रीवरच गणेशोत्सव पुढे नेऊया.

सुरवातीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महोत्सवाच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. ढोल ताशांची सलामी घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः ढोल वाजवून ढोल पथकाला प्रोत्साहन देत या उपक्रमाचे उद्घाटन केले. तसेच महोत्सवासाठी तयार करण्यात आलेल्या शुभंकर व बोधचिन्हाचे अनावरण करून उत्सवाच्या थिम साँचे उद्घाटन केले.

यावेळी पुणे शहरातील शतकोत्तर रौप्य महोत्सवी परंपरा असलेल्या कसबा गणपती मंडळ, तांबडी जोगेश्वरी मंडळ, गुरुजी तालीम मंडळ, तुळशीबाग मंडळ, केसरीवाडा मंडळ, भाऊ रंगारी मंडळ, अखिल मंडई गणोशोत्सव मंडळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, शनिपार मंडळ, अखिल नवी पेठ हत्ती गणपती मंडळ, शनिवार वीर मारोती मंडळ, नागनाथपार मित्र मंडळ, राजाराम मंडळ, काळभैरव मंडळ या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुरलीधर मोहोळ यांनी केले. तर आभार सिद्धार्थ धेंडे यांनी मानले. या कार्यक्रमाला पुणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा