महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
अनुसूचित जमातीतील घटकांच्या कौशल्य विकासासाठी प्रयत्न करा - केंद्रीय राज्यमंत्री सुदर्शन भगत मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०१८
कोल्हापूर : शहरी भागापासून लांब डोंगरी भागांमधून राहणाऱ्या अनुसूचित जमातीतील लोकांमध्ये अनेक अंगभुत परंपरागत कला असून या घटकातील लोकांच्या कौशल्य विकासासाठी अधिकाधिक प्रयत्न करा, असे प्रतिपादन केंद्रीय आदिवासी विकास राज्यमंत्री सुदर्शन भगत यांनी केले.

श्री क्षेत्र सिद्धगिरी मठ, कणेरी येथे आयोजित बैठकीत आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा केंद्रीय आदिवासी विकास राज्यमंत्री सुदर्शन भगत यांनी घेतला यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, कणेरी मठाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.डी. शिंदे, एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी सोनकवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमधील अनुसूचित जमातीची संख्या 5,04,652 एवढी आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात आदिवासी उपयोजनांमधून या घटकांच्या विकासासाठी निधी दिला जातो. यातून विविध विकास योजना राबविण्यात येतात. याची माहिती घेऊन केंद्रीय आदिवासी विकास राज्यमंत्री सुदर्शन भगत यांनी डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना, प्री मॅट्रीक स्कॉलरशीप, नामांकित इंग्रजी शाळांमधून अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना शिक्षण, एकलव्य मॉडेल स्कुल, विविध घरकुल योजना, पंडित दिनदयाळ स्वयंयोजना आदिंची सविस्तर माहिती घेतली. यावेळी त्यांनी या समाजातील घटकांमधील कौशल्य विकसित करुन त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणावे, असे सांगितले.

बैठकीनंतर त्यांनी श्री क्षेत्र सिद्धगिरी मठामध्ये आयोजित केलेल्या सिद्धगिरी कारागीर महाकुंभाला भेट दिली व मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामी यांचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे सांगितले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा