महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
विधानसभा प्रश्नोत्तरे : मंगळवार, १० जुलै, २०१८
कल्याण-डोंबिवली मनपामध्ये समाविष्ट 27 गावांमधील नागरिकांकडून
सक्तीने मालमत्ता कराची वसुली करु नये - मुख्यमंत्र्यांचे महापालिकेला निर्देश

नागपूर :
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केलेल्या 27 गावांमधील नागरिकांची भावना लक्षात घेता महापालिकेने त्यांच्याकडून अतिरिक्त मालमत्ता कराची सक्तीने वसुली करु नये, असे निर्देश दिले जातील. या 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

सदस्य किसन कथोरे यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, ज्या ग्रामपंचायती महापालिकेत समाविष्ट होतात त्यांना सुरुवातीचे दोन वर्ष ग्रामपंचायतीप्रमाणे कर द्यावा लागतो. त्यानंतर वीस टक्क्यांनी करवाढ होते. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केलेल्या 27 गावांमधील नागरिकांची भावना लक्षात घेता यांच्याकडून सक्तीने वसुली न करण्याचे निर्देश महापालिकेला दिले जातील.

या 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्यासाठी अधिसूचना काढण्यात आली असून त्यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. विभागीय आयुक्तांना या संदर्भात अहवाल सादर करण्याविषयी सांगण्यात आले असून जुलैअखेर अहवाल प्राप्त होताच याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

या 27 गावांमध्ये अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी 180 कोटी रुपये देण्यात आले आहेत. कल्याण ग्रोथ सेंटरमध्ये मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून रस्त्यांची कामे सुरु करण्यात आली असून त्यासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

रस्त्यांमधील खड्डे बुजविण्याकरिता महापालिकांनी आयआयटीकडील तंत्रज्ञानाचा वापर करावा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रस्त्यांमधील खड्डे बुजविण्याकरिता आयआयटी कडील तंत्रज्ञानाचा वापर महापालिकांनी करण्यासाठी प्रयत्न करावा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.

सदस्य संतोष दानवे यांनी मुंबईत दरवर्षी रस्त्यांवरील खड्डयांच्या दुरुस्तीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी यावर्षी साडेनऊ कोटी रुपयांच्या निविदा मागविण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेने खड्डे बुजविण्यासाठी विशिष्ट रसायने वापरुन नवीन पद्धतीचे मिश्रण तयार केले आहे. ते पावसात देखील वापरता येते. बुजविलेले खड्डे पावसाळ्यात तग धरु शकतील अशा शित डांबरमिश्रीत खडीची चाचणी घेण्यात आली आहे. या खडीचे उत्पादन महापालिकेच्या मालकीच्या अस्फाल्ट संयंत्रातून करण्याकरिता त्यात योग्य असे बदल करण्यात आले आहेत.

मुंबईत 1941 किलोमीटर लांबीचे रस्ते असून त्यात मुंबई महापालिकेच्या अखत्यारित 1200 किलामीटर लांबीचे डांबरी रस्ते आहेत.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा