महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
मत्स्यव्यवसाय कृषि व्यवसायाला समतुल्य -विभागीय आयुक्त अनूप कुमार मंगळवार, १२ सप्टेंबर, २०१७
नागपूर : मत्स्यव्यवसाय कृषी व्यवसायाला समतुल्य मानला जावा. त्याप्रमाणे मच्छीमारांना लाभ मिळावा. त्यानुसार सद्यस्थितीचा अभ्यास करताना मत्स्यव्यवसायातील काही अटी शिथील करण्याची गरज असल्याचे मत विभागीय आयुक्त तथा महाराष्ट्र पशुसंवर्धन व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु अनूप कुमार यांनी व्यक्त केले.

‘तलाव तेथे मासोळी’अभियानाअंतर्गत विभागीयस्तरावरील आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी विभागातील झालेले काम, पुढील कामाविषयी चर्चा व मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी मत्स्यव्यवसाय विकास आयुक्त गोविंद बोडके, विदर्भ विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य डॉ.कपील चांद्रायन, उपायुक्त (नियोजन) बी.एस.घाटे, मत्स्य व्यवसाय प्रादेशिक उपायुक्त समीर परवेझ, महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचे संचालक, संशोधन तथा अधिष्ठाता डॉ.ए.एस.बन्नाळीकर, मत्स्य विज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ.पी.टी.जाधव, कुलसचिव तथा नियंत्रक डी.बी.राऊतआदी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्याकडे पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचा कुलगुरुंचा अतिरिक्त कार्यभार असल्यामुळे विदर्भातील गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय विकास कृती आराखड्याची सद्यस्थिती जाणून घेऊन पुढील नियोजन व संबंधित कार्यवाही करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर मत्स्यव्यवसाय विभाग तसेच महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘तलाव तेथे मासोळी’ अभियान संपूर्ण नागपूर विभागात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

अनूप कुमार म्हणाले की, ‘तलाव तेथे मासोळी’ अभियान नागपूर विभागात प्रभावीपणे राबविण्यात येत असून याचधर्तीवर हे अभियान आता राज्यस्तरावर राबविले जाणार आहे. मत्स्यव्यवसायाच्या बाबतीत तेलंगणा, आंध्रप्रदेश या राज्यांनी चांगली प्रगती साधली आहे. मत्स्य व्यवसायासारख्या पूरक व्यवसायामुळे शेतकऱ्यांचे शेतीवरील अवलंबित्व कमी होऊन त्यांची आर्थिक स्थिती उंचावण्यास मदत होते. शासनाच्या विविध उपक्रमाअंतर्गत जी शेततळी तयार झाली त्याची अद्ययावत माहिती मत्स्य विभागाने घ्यावी. तसेच शेततळ्यामध्ये पाण्याची पातळी कमी झाल्यास त्यातील पाण्याचे कृत्रिम रुपाने पुनर्भरण करावे. जेणेकरुन मत्स्य व्यवसायाकरिता पाण्याची उपलब्धता कायम राहील. भूजलीय मत्स्य कायदा व धोरणे राज्यस्तरावर तयार करणे आवश्यक आहे. अशा प्रकारचा कायदा छत्तीसगड, ओरिसा, उत्तरप्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये अस्तित्वात आहे. हा कायदा आपल्याकडे लागू व्हावा, मत्स्य व्यवसाय हा शेती व्यवसायाप्रमाणे एक मुख्य व्यवसाय म्हणून ओळखला जावा, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. मत्स्यव्यवसाय करतांना जलाशय किंवा तलावातील पाण्याची बारमाही व्यवस्था राहावी याकरिता काय करता येईल याबाबतही यावेळी त्यांनी संबंधितांशी चर्चा केली.

पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाच्यावतीने क्षेत्रीय काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘तलाव तेथे मासोळी’ अभियानाअंतर्गत मत्स्यव्यवसायाचे महत्त्व, उद्दीष्ट्ये, नियोजन, शास्त्रोक्तपद्धतीने तांत्रिक मार्गदर्शन याबाबत अध्ययन करण्याबाबत क्षेत्रीय भेटी व मार्गदर्शन करावे, असे अनूप कुमार यांनी यावेळी सुचविले.

‘तलाव तेथे मासोळी’ अभियाना अंतर्गत नागपूर विभागात एकूण 1506 तलावांची निवड केली आहे. या तलावांचे एकूण जलक्षेत्र 4 हजार 622 हेक्टर 40 आर इतके आहे. यामध्ये बोटुकलीच्या संचयनाचे 285.54 लाख एवढे उद्दिष्ट आहे. या सर्वांसाठी अंदाजे 3 कोटी 50 लाख एवढा खर्च अपेक्षित आहे. हा निधी नाविन्यपूर्ण योजना तसेच मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत प्राप्त होत आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा