महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
खासदार डॉ.हिना गावीत यांच्याहस्ते ‘लोकराज्य’ अंकाचे लोकार्पण गुरुवार, ११ ऑक्टोंबर, २०१८

लोकराज्यमधील यशकथा ठरतील प्रेरणादायी
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना लेख वाचनीय

 

नंदुरबार : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित होणाऱ्या लोकराज्य मासिकाच्या ऑक्टोबर, 2018 च्या अंकातील विविध यशकथा, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा स्वच्छ इंधन, उत्तम जीवन हा लेख शेतकरी, नागरिक व महिलांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन खासदार डॉ.हिना गावीत यांनी आज केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात आज लोकराज्यच्या माहे ऑक्टोबर, 2018 च्या विशेषांकाचे प्रकाशन त्यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी डॉ.गावीत बोलत होत्या. यावेळी आमदार डॉ.विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा शिक्षणाधिकारी श्री.ए.व्ही.कदमजिल्हा माहिती अधिकारी जगन्नाथ पाटील, अक्कलकुवा नवोदय विद्यालयाचे प्राचार्य व्ही.एन.राव, संगणकचालक दिनेश चौरे आदि उपस्थित होते.

 

खासदार डॉ.गावीत यावेळी म्हणाल्या की, लोकराज्यमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांसह शासकीय माहिती, शेतकऱ्यांनी राबविलेल्या उपक्रमांची माहिती असते. लोकराज्य मासिकाच्या माहे ऑक्टोबरच्या अंकात महाराष्ट्राच्या परिवर्तन कथाचा समावेश आहे. त्या शेतकरी आणि नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरतील, स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लोकराज्य अत्यंत महत्त्वपूर्ण असून विद्यार्थ्यांनी लोकराज्यचे वाचन करावे, असे आवाहन खासदार डॉ. हिना गावीत यांनी केले.

 

जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले की, लोकराज्य मासिक हे मासिक नसून तो संदर्भग्रंथ आहे. लोकराज्यतून येणारी माहिती ही आकडेवारीसह व अचूक असते त्यामुळे विद्यार्थ्यांनी भावी जीवनाची वाटचाल करतांना लोकराज्यचा अंक आवश्यक वाचावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा