महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
मंत्रालयीन स्तरावर बैठका घेऊन जिल्हयाच्या विकासकामांना मार्गी लावणार - अर्जुन खोतकर शनिवार, १४ एप्रिल, २०१८
उस्मानाबाद : पालकमंत्री अर्जुन खोतकर हे नुकतेच जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी येथील अधिकाऱ्यांच्या बैठकीत विविध कामांचा आढावा घेतला. या बैठकीत त्यांनी मंत्रालयीन स्तरावर वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेण्याविषयी मनोदय व्यक्त केला.

श्री.खोतकर म्हणाले, महावितरण अंतर्गत येणाऱ्या डीपीचा पुरवठा, महानिर्मिती अंतर्गत येणाऱ्या 50 मेगावॅट क्षमतेचे सोलार प्लांट, आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या सामान्य रुग्णालयाच्या नव्या इमारतीचे अपूर्ण काम तात्काळ पूर्ण करणे, यासाठी सिद्धिविनायक ट्रस्टला देण्यासाठी सविस्तर प्रस्ताव तयार करण्यास पालकमंत्री श्री.खोतकर यांनी जिल्हा शल्य चिकीत्सकांना सूचना दिल्या. त्याचबरोबर अपूर्ण बांधकाम पूर्ण करणेकरिता, सीसीटीव्ही, लिफ्ट ही कामे पूर्णत्वास नेण्याकरिता आरोग्य विभागाकडून आवश्यक निधी मिळावा यासाठीही आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांच्याकडे बैठक घेण्यात येईल. तसेच सास्तूर रुग्णालय एक आदर्श असे रुग्णालय आहे. त्याच्या अधिक बळकटीकरणाकरिता निधीची आवश्यकता आहे, तरी डॉ.रमेश जोशी यांनी या रुग्णालयाच्या बळकटीकरणा करिता कोणत्या बाबी आवश्यक आहे, याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तात्काळ मंत्रालयात पाठवावा, असे श्री.खोतकर यांनी डॉ.जोशी यांना सुचित केले.

जि.प. अध्यक्ष नेताजी पाटील यांनी जिल्ह्यातील छोटे बंधारे गेट दुरुस्ती होणे गरजेचे आहे अशी व्यथा मांडल्यावर त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव संबंधित अधिकाऱ्यांनी शिर्डी संस्थानला देण्यासाठी तयार करावा, त्याचा पाठपुरावा मी स्वत: घेईन, असे पालकमंत्री श्री.खोतकर यांनी जि.प. अध्यक्षांना आश्वासन दिले.

भूसंपादन कार्यवाहीबाबत अनेक लेखी, तोंडी, तक्रारी प्राप्त होत आहेत. त्याबाबत श्री.खोतकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सर्व कागदपत्रासह मंत्रालयात वरिष्ठ पातळीवर बैठक घेण्यासाठी बोलाविण्यात येईल असे स्पष्ट केले.

याशिवाय प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणि राष्ट्रीय महामार्गांतर्गत निर्माण होणारे रस्ते याबाबतही तक्रारी प्राप्त होत आहेत असे सांगूण पालकमंत्री श्री.खोतकर म्हणाले, मी काही रस्त्यांची पाहणी केली आहे, आणखीही पाहणी करणार आहे. त्यानंतर त्याबाबतची वस्तुस्थिती पाहून त्याचबरोबर पत्रकार संघर्ष समितीचे म्हणणे ऐकून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची वरिष्ठ पातळीवर बैठक बोलाविली जाईल व त्यावर तात्काळ निर्णयही घेण्यात येतील असेही ते म्हणाले.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा