महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
मान्सून पूर्वतयारी करुन सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे - विभागीय आयुक्त डॉ.भापकर बुधवार, १७ मे, २०१७
औरंगाबाद : विभागातील सर्व यंत्रणांनी मान्सून पूर्वतयारी करावी. आवश्यक त्या सर्व साहित्य, सुविधांचा आढावा घ्यावा. त्याचबरोबर पोलीस, सेना दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद बल, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, कृषी आदींसह सर्व विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयाने सतर्क राहावे. 24 तास नियंत्रण कक्षाची स्थापना करावी, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी आज येथे दिल्या.

विभागीय आयुक्तांच्या दालनात आज मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता आदींशी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भांबरे, औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा पोलीस अधीक्षक आरती सिंह, कर्नल आर. शर्मा, अपर विभागीय आयुक्त श्री.कचरे, उपायुक्त वर्षा ठाकूर, पारस बोथरा, श्रीमती मैत्रेवार आदींसह सर्व विभागीय कार्यालयीन प्रमुखांची उपस्थिती होती.

सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी 24 तास आपत्ती नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावा. तसेच नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. 1077 हा टोल फ्री क्रमांक सुरू असल्याबाबत खात्री करावी. जिल्हा, तालुका, गाव पातळीवरील आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडे तयार करावेत. त्याबाबत रंगीत तालीम घ्यावी. विविध स्तरावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यस्थापनविषयक प्रशिक्षण द्यावे. शीघ्र प्रतिसाद चमूची (Quick Response Team) स्थापना करावी. आपत्ती काळात मदत करण्याच्या दृष्टीने छावणी उभारणे, ट्रान्झीस्ट शेल्टर बांधणे, गुरांच्या छावण्या उभारण्यात याव्यात, याबाबत विभागीय आयुक्त डॉ.भापकर यांनी यावेळी सूचना केल्या. आपत्ती व्यवस्थापनासाठी समन्वय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पत्ते, संपर्क क्रमांकासह प्रसिद्ध करावेत. संभाव्य आपत्तीवेळी उपयोगी मनुष्यबळ, इतर संसाधनाच्या वापराबाबतचा आढावा घ्यावा, असेही ते म्हणाले.

आपत्ती व्यवस्थापनासाठी सेना दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद बल, पाटंबधारे विभाग, महापालिका, नगर परिषद, ग्रामपंचायत, आरोग्य सेवा, महावितरण, दूरसंचार, सार्वजनिक बांधकाम विभाग, अग्नीशमन, जिल्हा माहिती कार्यालये आदींनी सतर्क राहून सोपविलेल्या कामांबाबत खबरदारी घ्यावी. कामात दिरंगाई करण्याऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा इशाराही डॉ.भापकर यांनी यावेळी दिला. मराठवाड्यातील संभाव्य आपत्ती निवारणाबाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करून आपत्ती निवारणासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.

गोदावरी पाटबंधारे विभागाचे सहायक मुख्य अभियंता एस.पी. भर्गोदेव यांनीही जलसंपदा विभागाच्या शासन निर्णयाद्वारे घोषित गोदावरी खोऱ्याच्या पूर नियंत्रणाबाबत करावयाच्या कार्यवाहीबाबत माहितीचे सविस्तर सादरीकरण केले. विविध जिल्हाधिकारी यांनीही जिल्ह्यातील मान्सून पूर्वतयारीचा आढावा विभागीय आयुक्त डॉ.भापकर यांच्यासमोर सादर केला. त्यानंतर डॉ.भापकर यांनीही त्यांच्या कार्याचे कौतूक करून मान्सूनपूर्व परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी यंत्रणा सक्षम, सज्ज असल्याचे सांगितले. त्याचबरोबर नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा