महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
शिक्षकांच्या समस्या तातडीने सोडवा - गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील रविवार, १६ जुलै, २०१७
  • शैक्षणिक सहविचार सभेचे आयोजन
  • शिक्षकांच्या तक्रारींचा त्वरेने निपटारा करावा

बुलडाणा : शिक्षण हा राज्याच्या व्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. शिक्षण पद्धतीवर देशाचे अथवा राज्याचे उज्ज्वल भविष्य अवलंबून असते. या पद्धतीचा शिक्षक हा कणा आहे. त्यामुळे कणा मजबूत असणे गरजेचे आहे. शिक्षकांच्या समस्या तातडीने सोडवून त्यांना ज्ञानदानाचे कार्य करणे सहज करावे, असे प्रतिपादन राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज केले.

जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात शैक्षणिक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शिक्षकांच्या समस्या सोडविताना राज्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे, मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, शिक्षण उपसंचालक श्री. राठोड, माजी आमदार धृपतराव सावळे, सभापती श्रीमती श्वेताताई महाले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी एम के देशमुख, शिवचन्द्र तायडे आदी उपस्थित होते.

शिक्षकांचे पगार वेळेवर करण्याच्या सूचना करीत राज्यमंत्री श्री पाटील म्हणाले, पगारासाठी शिक्षकांना प्रतीक्षा करावी लागू नये. तसेच एम सी व्ही सी, कनिष्ठ, माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करावी. या वेतनश्रेणीस पात्र असलेल्या शिक्षकांना त्वरित वेतनश्रेणी द्यावी. त्याचप्रमाणे शिक्षकांचे वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक विहित कालावधीत अदा करावे. या देयकांसाठी विहित कालावधीत अंमलबजावणी कार्यक्रम ठरवावा.

याप्रसंगी शिक्षकांनी विविध समस्या मांडल्या. त्यामध्ये चटोपाध्याय प्रलंबित प्रकरणे, अंशदायी निवृत्ती वेतन योजना बंद करून जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणे, अंशदाय निवृत्ती वेतन योजनेत कपात झालेले निधीबाबत पावत्या देणे आदी प्रश्नांचा समावेश होता.

सर्व प्रश्न त्वरित सोडविण्याचे आश्वासन देत काही प्रश्न जागेवरच मंत्रिमहोदयांनी सोडविले. या सभेचे संचालन अंजली नेटके यांनी केले. सभेला उपशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी आदींची मोठया संख्येने उपस्थिती होती.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा