महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
सर्व महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा- जी. श्रीकांत रविवार, १४ एप्रिल, २०१९


पुरुषापेक्षा महिला मतदारांचे मतदानाचे प्रमाण वाढले पाहिजे
लातूर :
भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 चा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. त्यामुळे आपल्या देशात लोकशाहीचा राष्ट्रीय महोत्सव सुरू आहे. त्याच अनुषंगाने लातूर जिल्ह्यात 41- लातूर लोकसभा मतदारसंघात दिनांक 18 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार असून या मतदानाच्या प्रक्रियेत लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून मतदानाच्या प्रक्रियेत आपला सक्रीय सहभाग देण्याचा संकल्प करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत यांनी केले.

जिल्हा प्रशासनामार्फत टाऊन हॉल ते जिल्हा क्रीडा संकुल पर्यंत आयोजित महिला मतदार संकल्प रॅलीच्या समारोपप्रसंगी जिल्हाधिकारी श्रीकांत मार्गदर्शन करत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन इटनकर,सौ सोनम जी. श्रीकांत, डॉ. शालिनी विपीन इटनकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी दीपाली मोतियाळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जे एस शेख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, शिक्षणाधिकारी (प्रा.) वैशाली जमादार यांच्यासह आरोग्य, शिक्षण व महिला बचत गटांच्या महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेल्या होत्या.

यावेळी जिल्हाधिकारी श्रीकांत म्हणाले की, सन 2009 व सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीचा विचार करता महिला मतदारांची पुरुष मतदारांपेक्षा मतदानाची टक्केवारी ही कमी आहे. त्यामुळे दिनांक 18 एप्रिल 2019 रोजी लातूर लोकसभेसाठी होणाऱ्या मतदानामध्ये महिला मतदानाचे प्रमाण पुरुष मतदारांपेक्षा अधिक झाले पाहिजे. याकरिता सर्व महिला मतदारांनी मतदानाच्या दिवशी आपला मतदानाचा हक्क बजाविण्याचा संकल्प केला पाहीजे, असे आवाहन त्यांनी केले.

सध्या संपूर्ण देशभरात भारतीय लोकशाहीचा महोत्सव सुरू असून या उत्सवात सर्व मतदारांनी सहभागी होणे गरजेचे असून विशेषतः महिला मतदारांनी या महोत्सवात अधिक सक्रिय सहभाग नोंदवून पुरुष मतदारांपेक्षा अधिक मतदान करावे, व भारतीय लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर योगदान दयावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी केले.

जिल्ह्यात मिशन डिस्टिंक्शन अंतर्गत मतदारांमध्ये मतदान करण्याविषयी जागृती केली जात आहे. या उपक्रमात सर्व शासकीय यंत्रणा तसेच स्वयंसेवी संस्था शाळा/ महाविद्यालय आदी मोठ्या प्रमाणावर सहभागी होत असून प्रत्येक जबाबदार नागरिक या मोहिमेत सक्रिय सहभाग देत असून दिनांक 18 एप्रिल रोजी या सर्व उपक्रमाचे फलीत आपल्यासमोर दिसून येण्यासाठी सर्व यंत्रणांनी अत्यंत दक्षपणे काम करावे, असे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितले. या मतदानाच्या प्रक्रियेत महिला मतदारांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावे याकरिता निवडणूक प्रशासनाकडून मतदान केंद्रावर महिलांसाठी विविध सुविधा दिल्या जात असून एका पुरुषाने मतदान केल्यानंतर दोन महिलांना मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर सोडले जाणार आहे त्याप्रमाणेच मतदान केंद्राच्या जवळच बाल संगोपन कक्ष निर्माण करून लहान बाळ असलेल्या महिलांना मतदान करता यावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्याप्रमाणेच बी एल ओ घरोघरी जाऊन आपलं मतदान कोणत्या केंद्रावर आहे याची माहिती देणार आहेत, असे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा