महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
तूर डाळ, खाद्य तेलाबाबत घेतलेल्या निर्णयांचा शेतकऱ्यांना लाभ - पाशा पटेल बुधवार, ११ ऑक्टोंबर, २०१७
नवी दिल्ली : तूर डाळ आणि खाद्य तेलाच्या आयात-निर्यातीबाबत केंद्र शासनाने घेतलेल्या निणर्यांचा लाभ शेतकऱ्यांना होत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली.

श्री. पटेल यांनी परिचय केंद्राला भेट दिली, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

श्री. पटेल म्हणाले, वेगवेगळ्या कारणांनी तूर, मूग आणि उडीद या डाळींच्या निर्यातीवर बंदी आणण्यात आली होती. यासह परदेशातून मोठ्या प्रमाणात खाद्यतेल आयात करण्यात येत होते. त्यामुळे देशांतर्गत उत्पादन होणाऱ्या तेलाचे भाव पडायचे. यामुळे डाळ, तेल उत्पादक शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते. तूरडाळ आणि खाद्यतेल उत्पादक शेतकऱ्यांची यामुळे होणारी कुंचबणा थांबविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून डाळी तसेच खाद्य तेलाबाबतच्या एकूण परिस्थितीची माहिती दिली.

प्रधानमंत्र्यांनी यासंदर्भातील तथ्य लक्षात घेऊन याबाबत केंद्रीय वित्तमंत्री अरूण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती नेमली. ज्यात केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रातील अन्य मंत्र्यांचा समावेश होता. या समितीने केलेल्या अभ्यासांतर्गत शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, असे धोरण आखले. याअंतर्गत 5 ऑगस्ट 2017 रोजी केंद्र शासनाने एक महत्वाचा निर्णय तूरडाळीसंदर्भात घेतला असून यामध्ये 2 लाख मेट्रीक टनापेक्षा अधिक तूरडाळ आयातीवर बंदी आणली. 11 ऑगस्ट 2017 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार आयात होणाऱ्या खाद्यान्न तेलावर 10% टक्के आयात शुल्क लावायचे. 21 ऑगस्ट 2017 रोजी केंद्र शासनाने अधिसूचना काढून मूग, उडीद या डाळी 1 लाख मेट्रीक टनापेक्षा जास्त आयात करण्यात येऊ नयेत, असा निर्णय घेतला. 15 सप्टेंबर 2017 रोजी निघालेल्या अधिसूचनेनुसार तूर, मूग आणि उडीद या डाळीवर असणारी 12 वर्षांपासूनची निर्यात बंदी उठवून देशातील शेतकऱ्यांना निर्यात करण्याची परवानगी दिली. या निर्णयांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळण्याचे मार्ग मोकळे झाले असल्याचे श्री. पटेल यांनी स्पष्ट केले.

परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी श्री.पटेल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. परिचय केंद्राच्यावतीने दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, प्रकाशित करण्यात येणारी विविध प्रकाशने आणि प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आदींची माहिती श्री. कांबळे यांनी दिली. यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राची प्रकाशने श्री. पटेल यांना भेट स्वरूपात देण्यात आली. परिचय केंद्राचे ग्रंथालय तसेच कार्यालयाच्या विविध विभागांना भेट देऊन श्री. पटेल यांनी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा