महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महाराष्ट्राच्या १४ एनएसएस स्वयंसेवकांचा राजपथ पथसंचलनासाठी दिल्लीत सराव मंगळवार, ०८ जानेवारी, २०१९


नवी दिल्ली :
प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथ संचलनासाठी महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) १४ आणि गोव्यातील २ असे एकूण १६ विद्यार्थी - विद्यार्थीनी दिल्लीत सराव करीत आहेत.

यावर्षी प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणा-या पथसंचलनासाठी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयांतर्गत एनएसएस सराव शिबिराला येथील चाणक्यपुरी भागातील इंटरनॅशनल यूथ होस्टेल येथे १ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. देशभरातील १५ विभागांमधून एकूण २०० एनएसएस स्वयंसेवक या शिबिरात सहभागी झाले आहेत. पुणे विभागात समावेश असणाऱ्या महाराष्ट्रातून ७ विद्यार्थी आणि ७ विद्यार्थीनी तर गोव्यातून प्रत्येकी १ विद्यार्थी आणि १ विद्यार्थीनी असे एकूण १६ स्वयंसेवक या शिबीरात सराव करीत आहेत.

महाराष्ट्राच्या चमुत पुणे जिल्ह्यातील बारामती येथील विद्याप्रतिष्ठान संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा अक्षय जगदाळे, पुणे येथील सिंहगड इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एण्ड सायन्स नर्हे महाविद्यालयाचा दर्पेश डिंगर, पुणे येथील के बी जोशी इंस्टिट्यूट ऑफ आयटी महाविद्यालयाची श्रद्धा वंजारी, दौंड तालुक्यातील वरवंड येथील एकनाथ सीताराम महाविद्यालयाची पूजा पेटकर, अकोला जिल्ह्यातील अकोट येथील श्री. शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा सागर लापुरकर, मुंबईतील माटुंगा येथील आर. ए. पोदार महाविद्यालयाचा सुमंत मोरे, मुंबईतील अंधेरी येथील ठाकुर विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा आदर्श चौबे, नाशिक जिल्ह्यातील लासलगांव येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ कला, विज्ञान वाणिज्य महाविद्यालयाचा पुष्पक जगताप, नागपूर जिल्ह्यातील साकोली येथील एस. बी. के. महाविद्यालयाची भुमेश्वरी पुरमकर, मुंबई येथील उषा मित्तल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी महाविद्यालयाची हिमाद्री पांड्या, मुंबई येथील एम एल डहाणुकर महाविद्यालयाची शिवानी गोखले, अमरावती जिल्ह्यातील पुसद येथील वत्सलाबाई नाईक महाविद्यालयाची पूजा केवटे, नागपूर येथील शंकरनगर परिसरातील लाड महाविद्यालयाची श्रुती जाभुंळकर यांचा समावेश आहे.

यासोबतच गोव्यातील मान्द्रे महाविद्यालयाचा नितीन नाईक आणि पोरवोरीम येथील विद्या प्रबोधिनी महाविद्यालयाची सुविद्या नाईक या विद्यार्थिनींचा या चमुत समावेश आहे.

प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथसंचलनासाठी एकूण २०० पैकी १४८ विद्यार्थी विद्यार्थीनींची निवड करण्यात येणार आहे. त्यात महाराष्ट्र व गोव्यातील सर्वच म्हणजे १६ विद्यार्थी विद्यार्थीनीची निवड होईल असा विश्वास महाराष्ट्राच्या चमुचे समन्वयक तथा निफाड (जि.नाशिक) येथील के.जी.डी.एम. महाविद्यालयाचे प्राध्यापक रवींद्र आहिरे यांनी व्यक्त केला.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडु आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे एनएसएस स्वयंसेवक भेटणार असून यावेळी सादर होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील स्वयंसेवकांची निवड नक्की होईल, असा विश्वास प्रा. रवींद्र आहिरे यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र एनएसएसची गौरवशाली परंपरा
प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथ संचलनात राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे नेतृत्व करण्याचा बहुमान महाराष्ट्राच्या सोपान मुंडे, खूशबु जोशी आणि आसीफ शेख यांनी मिळविला आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा