महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
राज्यातील आदिवासींच्या विकासाकरिता 8,969 कोटी रुपयांची तरतूद- आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा शुक्रवार, ०९ मार्च, २०१८
पालघर : राज्यातील आदिवासींच्या विकासाकरिता आदिवासी उपयोजनेसाठी भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाने सन 2018-19 या वर्षीच्या अर्थसंकल्पात तब्बल 8,969 कोटी रुपयांची तरतूद केली असून या खेरीज राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित निवासी शाळेत शिक्षण घेता यावे, यासाठी 378 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प राज्यातील आदिवासींना आणि आदिवासी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा ठरला आहे, अशा शब्दात आज विधानसभेत सादर झालेल्या राज्याच्या सन 2018-19 च्या अर्थसंकल्पावर आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

श्री. सवरा म्हणाले की, या वर्षीच्या अर्थसंकल्पात अनेक नाविन्यपूर्ण आणि नवीन योजनांचा समावेश आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया योजना (रु. 50 कोटीची तरतूद), मुख्यमंत्री ग्रामीण सांडपाणी प्रक्रिया व्यवस्थापन प्रकल्प (रु.335), राज्यात सहा कौशल्य विद्यापिठांची स्थापना, मानव निर्देशांक कमी असलेल्या आदिवासीबहुल नंदूरबार व गडचिरोली तसेच उस्मानाबाद आणि वाशिम या जिल्ह्यांसाठी रु. 125 कोटी, 27 लाखाची तरतूद विविध स्पर्धा परिक्षेस महाराष्ट्रातील तरुणांचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रत्येक जिल्हा स्तरावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन स्थापन करण्याची तरतूद, दारिद्र्य रेषेवरील शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात अन्न धान्याचा लाभ देण्यासाठी 922 कोटी, 68 लाख रुपयांची तरतूद, शासकीय योजनांची माहिती थेट जनतेला स्वत: होऊन करुन घेता यावी, यासाठी टोल फ्री क्रमांकाचा ‘लोक संवाद’ हा उपक्रम सुरु करण्याचा संकल्प आणि राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोग लागू करण्यासाठी भरीव तरतूद यामुळे हा अर्थसंकल्प वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. अर्थसंकल्पातील जलसिंचन, जलयुक्त शिवार, विहिरी व शेततळी, वनशेती, वनशेतीस प्रोत्साहन, फलोत्पादन योजनेचा विस्तार, राज्यातील रस्ते विकासासाठी 10,228 कोटी रुपयांची तरतूद, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी 2,255 कोटी, 40 लाख रुपयांची तरतूद इ. मुळे हा अर्थसंकल्प राज्यातील शेतीसह एकूणच विकासाला मोठी चालना आणि गती देणारा ठरणार आहे, असे मंत्री विष्णु सवरा यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा