महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
फेकन्युज पोस्ट केल्याने अटकेची कारवाई गुरुवार, ११ एप्रिल, २०१९

39- बीड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019

बीड : 39-बीड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू असून फेक न्युज पोस्ट करणे आणि समाज माध्यमांवरील पोस्टच्या संदर्भात नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर नियमांनुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय आणि जिल्हा पोलीस अधीक्षक  जी.श्रीधर यांनी सुचीत केले होते. 

संतप्त शिवसैनिकांची चौसाळ्यात येथे जिल्हाप्रमुख खांडे यांना मारहाण” या फेक न्युजमुळे कायदा व सुव्यवस्थाच्या अनुंषगाने जिल्ह्यातील शांतता भंग होऊ नये, यासाठी  कारवाई करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी श्री.पाण्डेय यांनी माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती आणि समाजमाध्यम कक्षास दिल्या होत्या. 

समाज माध्यम कक्षाने वरील घटनेच्या अनुषंगाने कारवाई करताना शिवसेना जिल्हा प्रमुख श्री.खांडे यांची तक्रार दाखल करून घेत संबंधितांवर तातडीने कारवाई केली. पुढील तपासाच्या दृष्टीने पोलीस स्टेशन शिवाजी नगर,बीड मध्ये गुन्हा नोंद झाला. संशयित राहूल कदम व प्रमोद धन्वे यांनी फेसबुक वरुन पोस्ट केल्याचे दिसून आले. यामुळे श्री.धन्वे यांना अटक करून जामीन मंजूर झाल्याने  मुक्त करण्यात आले  तर राहुल कदम यांच्या अटकेसाठी पोलीस कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती एमसीएमसी समितीचे सदस्य तथा समाज माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी पोलीस निरीक्षक जी.आर. पाळवदे यांनी दिली.

निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील शांतता व कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी प्रशासन आवश्यक ती पावले उचलत असून नागरिकांनी फेक न्युज  व अफवांवर  विश्वास ठेवू नये, तसेच  फेक न्युज, समाज माध्यमांवर खोट्या पोस्ट प्रसारीत करु नयेत, असे जिल्हाधिकारी श्री.पाण्डेय यांनी आवाहन केले आहे.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा