महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
लोकराज्य वाचनामुळे प्रशासकीय अधिकारी झालो - सुधीर खांदे बुधवार, १२ सप्टेंबर, २०१८
नंदुरबार : राज्याच्या प्रशासनात ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रशासकीय अधिकारी आहेत. विद्यार्थी दशेत स्पर्धा परिक्षा देताना त्यांनी ज्ञानार्जनासाठी लोकराज्य मासिकाचे वाचन केल्यामुळेच ते त्या पदापर्यंत पोहोचले असल्याचे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी (निवडणूक) सुधीर खांदे यांनी केले.

जिल्हा माहिती अधिकारी व जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या सयुक्त विद्यमाने आज जिल्हा ग्रंथालयाच्या सभागृहात लेाकराज्य वाचक अभियान, लोकराज्य विक्री प्रदर्शन व स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी माहिती व्हावी यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी (निवडणूक) सुधीर खांदे यांच्या हस्ते फित कापून तसेच ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष दैनिक उत्तर महाराष्ट्राचे संपादक योगेद्र दोरकर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. पितांबर सरोदे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव प्र. जि.मा.अ. जगनाथ पाटील एकलव्य शाळेचे गजानन किनकर उपस्थित होते.

यावेळी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, मी विद्यार्थी दशेत असताना स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी लेाकराज्य मासिकाचे वाचन केले आहे. त्यामुळेच मी प्रशासकीय अधिकारी झालो, ग्रामीण भागतील विद्यार्थी स्पर्धा परिक्षा देण्यासाठी शहरात अभ्यासासाठी येतात त्यांच्या मनात नेहमी भीती असते. विद्यार्थ्यांनी आपला मनातील न्युनगंड काढून टाकावा, विद्यार्थ्यांनी मनाशी खुणगाठ बांधून स्पर्धा परिक्षा देऊन प्रशासनात अधिकारी व्हावे. पुढे म्हणाले की, स्पर्धा परिक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी जिल्हा ग्रंथालयातील उपलब्ध असलेल्या पुस्तकांसह लोकराज्य मासिकाच्या उपयोग करून आपली वाटचाल करावी, असे यावेळी त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. पितांबर सरोदे म्हणाले की, लोकराज्य मासिक गेल्या 60 ते 65 वर्षापासून महाराष्ट्राच्या जनतेला वाचण्यासाठी उपलब्ध आहे. माझ्याकडे जुन्या लोकराज्य मासिकाचा खजाना असून आजही मी लोकराज्य मासिकाचे नियमित वाचन करतो, आज विद्यार्थ्यांसाठी सोयीयुक्त ग्रंथालय असून ग्रंथालयातील पुस्तकांचा व ग्रंथाचा खजाना आहे. त्याचा पुरेपूर उपयोग विद्यार्थ्यांनी करुन घ्यावा असे त्यांनी सांगितले.

यावेळी दैनिक उत्तर महाराष्ट्राचे संपादक योगेंद्र दोरकर म्हणाले लोकराज्य मासिकाचे अंक वाचनीय असून त्याचे रुपही आता बदलेले आहे. यापुढे ग्रंथालयाने स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन मेळावा ठेवावा, या मेळाव्यासाठी आपण हातभार लावू असे त्यांनी सांगितले.

प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी जगन्नाथ पाटील यांनी लोकराज्य वाचक मेळावा व लोकराज्य विक्री प्रदर्शन आयोजनामागील भुमिका स्पष्ट करताना सांगितले की, राज्यात 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात ग्रंथालय, महाविद्यालये व शैक्षणिक संस्था याठिकाणी लोकराज्य वाचक मेळावे, प्रदर्शन व विक्री असा अभिनव कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.

आपल्या प्रास्ताविकात जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव यांनी सांगितले की, लोकराज्याचे आजतागायतचे अंक बघता महाराष्ट्राचा धावता इतिहास आपल्या नजरेसमोर अभा राहतो. पुढे म्हणाले की नंदुरबारमध्ये शासकीय ग्रंथालय 2010 मध्ये सुरु झाले असून ग्रंथालयात 59 हजार पुस्तके असून त्यात स्पर्धा परिक्षेचे तसेच वेगवेगळे ग्रंथ आहेत. ग्रंथालयात 466 वाचक मेंबर्स असून ग्रंथालयाच्या माध्यमातून जनतेमध्ये वाचन संस्कृती रुजविण्याचे काम केले जात आहे.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सामर्थ्य शिक्षणाचे, समृद्ध महराष्ट्राचे या लोकराज्य विशेषांकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन किशोर पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा ग्रंथालयाचे तांत्रिक सहायक किशोर निकुंभे यांनी मानले.

लोकराज्य वाचक मेळावा यशस्वी करण्यासाठी दिनेश चौरे, रविंद्र शिंदे, बंडू चौरे, ईस्माईल मणियार,चंद्रकांत अहिरे यांनी परिश्रम घेतले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा