महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महाआरोग्य शिबिराच्या यशस्वितेसाठी परिपूर्ण नियोजन करावे - पालकमंत्री जयकुमार रावल बुधवार, १९ एप्रिल, २०१७
नंदुरबार : नंदुरबार येथे प्रथमच 30 एप्रिल 2017 रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम अनुकरणीय असून या शिबिराचा नंदुरबार जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी लाभ घेतला पाहिजे. या शिबिराच्या यशस्वितेसाठी सर्वांनी परिपूर्ण नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री जयकुमार रावल यांनी येथे दिले.

नंदुरबार येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी गरजू रुग्णांच्या नोंदणी अभियान व सर्वेक्षणास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री श्री.रावल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. आमदार डॉ.विजयकुमार गावित, जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी घनश्याम मंगळे, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे, अपर जिल्हाधिकारी अनिल पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे विशेष कार्य अधिकारी संदीप जाधव, रामेश्रवर नाईक, भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळेचे अधिष्ठाता डॉ.एस.एस.गुप्ता यांच्यासह विविध विभागांचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.रावल म्हणाले, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी हा उपक्रम जळगाव, नाशिक येथे राबविण्यात आला होता. हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला आहे. त्यानंतर आता नंदुरबार जिल्ह्यात महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले शल्यचिकित्सक, तज्ज्ञ डॉक्टर सहभागी होऊन रुग्णांची तपासणी करणार आहेत. त्यामुळे गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला पाहिजे. त्यासाठी आरोग्य यंत्रणेसह विविध विभागांनी ग्रामीण भागात जनजागृती करीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत या शिबिराची माहिती पोहोचवावी. जेणेकरुन गरजू रुग्ण या शिबिराचा लाभ घेऊ शकतील. या महाआरोग्य शिबिरासाठी रुग्णांच्या नोंदणीला सुरुवात झाली आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आपापल्या भागातील रुग्णांच्या नोंदणीसाठी पुढाकार घ्यावा. जिल्ह्यातील एकही रुग्ण या महाआरोग्य शिबिरापासून वंचित राहता कामा नये.

आमदार डॉ.गावित यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी शिबिराच्या यशस्वितेसाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा