महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जलयुक्त शिवार लोकसहभागातून पुढे जाणारे अभियान बुधवार, १२ सप्टेंबर, २०१८
विशेष लेख :

कमी-अधिक पर्जन्य पावसात येत असलेला खंड, पावसाची अनियमितता यामुळे वारंवार निर्माण होणाऱ्या टंचाई परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी सरकारने ‘जलयुक्त शिवार’ ही महत्त्वाकांक्षी योजना कार्यान्वीत केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य कायमस्वरुपी टंचाईमुक्त व टँकरमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. या योजनेला राज्यात मोठा प्रतिसाद मिळाला असून जलयुक्त शिवार अभियानातील कामांमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात कृषिक्षेत्र सिंचनाखाली आले आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या अंमलबजावणीबाबत राज्यातील सर्वच विभागातील परिस्थितीचा मुख्यमंत्री सातत्याने आढावा घेऊन प्रगती जाणून घेतात. जलयुक्त शिवारासाठी आलेला निधी वेळेवर खर्च होण्याबरोबरच या निधीतून चांगल्या प्रकारचे कामे झाली का याबाबत सविस्तर आढावा घेतला जातो. नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी जलयुक्त शिवार कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला असून ते जलयुक्त शिवार कामांचा सातत्याने आढावा घेतात. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रयत्नामुळे जलयुक्त शिवार अभियान नंदुरबार जिल्ह्यात यशस्वी होत असल्याचे दिसून येत आहे.


जलयुक्त शिवाराचे नंदुरबार जिल्ह्यात सन 2015-16 व ऑगस्ट, 2018 पर्यंत झालेल्या कामांबाबत सद्य परिस्थितीबाबत या लेखात थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत सन 2015-16 या वर्षापासून पुढील पाच वर्षे दरवर्षी 5 हजार गावांची निवड टंचाईमुक्त करण्यासाठीचे धोरण राज्य शासनाने निश्चित केले आहे. अशा प्रकारे पाच वर्षात राज्यातील 25 हजार गावांमधील टंचाईवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात येत आहे. सन 2015-16 यावर्षी 6 हजार 202 गावांची निवड करण्यात आली होती. तर 2016-17 या वर्षासाठी 5 हजार 281 गावांची निवड करण्यात आली आहे.

जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत निवड करण्यात आलेल्या गावांमधील पाण्याचा ताळेबंद करुन गावात पाण्याची उपलब्धता व आवश्यकता किती आहे व त्याकरीता कोणकोणते तंत्रज्ञान अवलंबविण्याची आवश्यकता आहे हे शिवार फेरी करुन ठरविण्यात येते. त्यानुसार गावाचा आराखडा तयार करण्यात येतो.

आराखड्यास जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांची मान्यता घेण्यात आल्यानंतर गावातील कामांना सुरुवात होते. गाव शिवारातील वाहून जाणारे पाणी विविध पध्दतीने शिवारातच अडविले जाऊन गावामध्ये विकेंद्रीत स्वरुपाचे पाणीसाठे निर्माण करणे ही या अभियानाची प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत.

जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत सन 2015-16 मध्ये नंदुरबार जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 72 गावांची निवड करण्यात आली होती. निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये 3 हजार 596 कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यावर 64 कोटी 52 लाख 42 हजार रुपये खर्च करण्यात आले असून या झालेल्या कामांमुळे 7107.30 टीसीएम पाणी अडविण्यात आले आहे, व या अभियानातून 100 टक्के गावे जल परिपूर्ण करण्यात आले आहेत.

जलयुक्त शिवाराच्या दुसऱ्या टप्प्यात सन 2016-17 मध्ये नंदुरबार जिल्ह्यात 69 गावांची निवड करण्यात आली त्यामध्ये 2 हजार 631 कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यावर 52 कोटी 84 लाख 98 हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. या कामांमुळे 9442.08 टीसीएम पाणीसाठा अडविण्यात आला आहे. तसेच या योजनेअंतर्गत घेण्यात आलेल्या विविध कामे/उपचारांमुळे 18 हजार 884 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे.

तिसऱ्या टप्प्यात सन 2017-18 मध्ये जिल्ह्यात 104 गावांची निवड करण्यात आली होती. या प्रस्तावित कार्यक्रमात 1 हजार 906 कामांवर 67 कोटी 20 लाख 86 हजार रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्याप्रमाणे 1 हजार 625 कामे पूर्ण करण्यात आली असून 270 विविध कामे प्रगतीपथावर आहेत. या कामांवर 29 कोटी 32 लाख 42 हजार रुपये खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे 5501.87 टीसीएम पाणीसाठा अडविण्यात आले आहे. या योजनेतून घेण्यात आलेल्या कामांमुळे 11003.75 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे.

सन 2018-19 या वर्षात जलयुक्त शिवार योजनेत जिल्ह्यात 180 गावांची निवड करण्यात आली असून ही संख्या मागील तीन वर्षात सर्वात जास्त आहे. या प्रस्तावित कार्यक्रमात 3 हजार 90 कामे घेण्यात आली असून यासाठी 105 कोटी 67 लाख 45 हजार रुपयांचा आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. निवडलेल्या गावामधील कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येऊन कामे सुरु करण्यात आली आहेत.

सन 2015-16 मध्ये जलयुक्त शिवार योजनेसाठी निवडलेल्या 72 गावांत 10 कामातून 113225 घ.मी. व सन 2016-17 मध्ये निवड केलेल्या 69 गावांत लोकसहभागातून 24 कामातून 22250 घ.मी. एवढा गाळ काढण्यात आलेला आहे. त्यामुळे सिंचनसाठा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व विभागातील बहुतेक सर्व जिल्ह्यातील विविध कामांना भेटी देऊन लोकसहभागाचे कौतुक केले आहे. लोकसहभागातील सातत्य टिकविणे आणि अभियानाला आलेले लोकचळवळीचे रुप टिकविणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

शब्दांकन - जगन्नाथ पाटील
प्र.जिल्हा माहिती अधिकारी, नंदुरबार
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा