महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
ट्रान्सफॉर्मर-वीज खांबांची ने-आण शेतकरी करणार नाही : ऊर्जामंत्री बुधवार, १७ मे, २०१७
  • हिंगोलीत नागरीकांशी थेट संवाद, तात्काळ तक्रारींचा निपटारा
  • तक्रारकर्तांच्या चेहऱ्‍यावर समाधान

हिंगोली : ट्रान्सफॉर्मर आणि विजेचे खांब ने-आण करण्यासाठी शासनाने निधी दिला असून शेतकऱ्यांनी डीपींची आणि खांबांची ने-आण करण्यास लावू नये, असे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला दिले.

हिंगोली येथे अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात आयोजित नागरिकांशी थेट संवाद कार्यक्रमात ऊर्जामंत्री बोलत होते. याप्रसंगी आमदार तानाजीराव मुटकुळे,नगराध्यक्ष बाबाराव बांगर, माजी खासदार शिवाजीराव माने, आमदार रामराव वडकुते व त्याचबरोबर महावितरणचे विभागीय संचालक संजय ताकसांडे, मुख्य अभियंता अविनाश पाटोळे, अधीक्षक अभियंता बाबासाहेब जाधव व अन्य उपस्थित होते. या संवाद कार्यक्रमात नागरिकांनी केलेल्या तक्रारीवर निकाल ऊर्जामंत्री यांनी दिला. प्रथमच हिंगोलीत असा उपक्रम राबविण्यात आल्याने भर कडक उन्हातही नागरिकांनी गर्दी केली होती. कंत्राटदार शेतकऱ्याला कामे सांगतांत, अभियंते, फोन उचलत नाही, वीज कनेक्शन मिळत नाही, ट्रान्सफॉर्मर मिळत नाही अशा साध्या तक्रारी यावेळी आल्या.

नागरिकांच्या तक्रारीवर ऊर्जामंत्र्यांनी संबंधित विभागाला कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता व कार्यकारी अभियंत्याकडून खुलासा मागवला, हिंगोली स्तरावरील तक्रारी आठवडाभरात व मोठ्या तक्रारी १५ दिवस ते महिन्याभरात सोडविण्याचे निर्देश दिले.

तीन हजार लोकसंख्येपेक्षा अधिक लोकसंख्याच्या ग्रामपंचायतींची कनिष्ठ अभियंत्यांनी संपर्क करुन ग्राम विद्युत व्यवस्‍थापकाची पद भरण्याची कारवाई करण्याचे निर्देश दिले. गेल्या अनेक दिवसांपासून डीपीची ने-आण शेतकरीच करतात या कामासाठी जे शेतकरी पैसे देतात त्यांच्याकडे डीपी लवकर लावली जाते अशा तक्रारी शेतकऱ्यांनी ऊर्जामंत्र्यांकडे केले. या तक्रारीसाठी अनेक शेतकऱ्यांच्या संतप्त भावना बघायला मिळाल्या.

या थेट संवाद कार्यक्रमात १३६ तक्रारी प्राप्त झाल्या या सर्व तक्रारी सुटण्यासारख्या आहेत. त्या दृष्टीने कामे पुर्ण करुन व्हॉट्सॲप वर पाठवून द्याव्यात. ३१ जुलै पर्यंत या तक्रारी न सुटल्यास कार्यकारी अभियंता, अधिक्षक अभियंता यांना जबाबदार धरण्यात येईल. आलेल्या तक्रारारीच्या अनुषंगाने दक्षता समितीतर्फे चौकशी करण्यात यावी, असे निर्देशही ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा