महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
‘संवाद वारी’ प्रदर्शन योग्य वेळी, अन् योग्य ठिकाणी ! - मुख्याध्यापक सुनिल निंबाळकर यांची प्रतिक्रिया बुधवार, ११ जुलै, २०१८
जेजुरी : शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या विविध योजना आहेत. पंढरपूरच्या वारीत राज्यातील शेतकरी, कष्टकरी जनता मोठ्या संख्येने सहभागी होते. या योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची हीच योग्य वेळ व जागा आहे. या संवाद वारीतील प्रदर्शनाचा उपयोग या शेतकऱ्यांना नक्कीच होईल, हा नाविन्यपूर्ण उपक्रम नक्कीच उपयुक्त असल्याचे मत मुख्याध्यापक सुनिल निंबाळकर यांनी व्यक्त केले.

जेजुरी येथील अहिल्यादेवी होळकर शाळेच्या प्रांगणात माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने संवाद वारी उपक्रमांतर्गत प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन पाहिल्यानंतर श्री. निंबाळकर बोलत होते.

श्री.निंबाळकर म्हणाले, गेले अनेक वर्ष जेजुरीत वारीच्या नियोजनात मी असतो. आमच्या शाळेच्या प्रांगणात अनेक प्रख्यात दिंड्या सहभागी होतात. मात्र यावर्षी शासनाच्या वतीने लावण्यात आलेले प्रदर्शन नक्कीच उपयुक्त आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शासनाच्या वतीने अनेक योजना राबविण्यात येतात. या योजना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास या निमित्ताने मदत होणार आहे.

‘संवाद वारी’तील प्रदर्शन माजी सैनिकाच्या मोबाईलमध्ये कैद !

माजी सैनिकांच्या व्हॉटस् ॲप ग्रुपवर होणार प्रसारण

जेजुरी : जुन्नर तालुका माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी असलेले रामदास मेहेर यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने जेजुरी येथे लावण्यात आलेले विविध योजनांच्या माहितीचे प्रदर्शन आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण करून कैद केले. या प्रदर्शनाचे चित्रीकरण श्री. मेहेर माजी सैनिकांच्या व्हॉटस् ॲप ग्रुपवर प्रसारित करणार असून माजी सैनिक असलेल्या जवानांनी या माहितीच्या आधारे आता उत्तम शेती करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

आयुष्यभर देशाची सीमा सुरक्षित राखण्यासाठी झटलेल्या जुन्नर तालुक्यातील माजी सैनिकांची एक संघटना आहे. ही संघटना माजी सैनिकांच्या कल्याणासाठी कार्यरत आहे. या संघटनेच्या वतीने माजी सैनिकांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. या संघटनेचे पदाधिकारी असलेल रामदार मेहेर यांनी संवाद वारीतील प्रदर्शन आपल्या मोबाईलच्या कॅमेरात चित्रीत केले.

श्री.मेहेर म्हणाले, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी संवाद वारीत लावण्यात आलेले प्रदर्शन अत्यंत उपयुक्त आहे. मी सैन्यदलातून निवृत्त झाल्यानंतर शेती करतो. मला 5 एकर शेती असून या शेतीत मी विविध प्रयोग करत असतो. या प्रदर्शनाच्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी अनेक योजनांची माहिती मला मिळाली. माझ्या संघटनेतील इतर माजी सैनिक सहकाऱ्यांनीही उत्तम शेती करून आपली प्रगती साधावी यासाठी मी या योजनांची माहिती आमच्या संघटनेच्या व्हॉटस् अॅप ग्रुपवर प्रसारित करणार आहे. तसेच तो इतरांनाही पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शासनाच्या योजनांचा लाभ घेऊया, सुखी होऊया !

जेजुरी : या प्रदर्शनात दाखविण्यात आलेल्या शेतीच्या अनेक योजनांचा लाभ मी घेतला आहे. शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येकाने घेऊया आणि त्या माध्यमातून सुखी होऊया असे सांगत संवाद वारी प्रदर्शन उपयुक्त असल्याची प्रतिक्रिया बुलडाणा जिल्ह्यातील सुभाष खारडे या शेतकऱ्याने दिली.

जेजुरी येथील अहिल्यादेवी होळकर शाळेच्या प्रांगणात शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने संवाद वारी उपक्रमांतर्गत प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन पाहिल्यानंतर श्री.खारडे बोलत होते.

श्री. सुभाष खारडे म्हणाले, मी माझ्या शेतात ठिबक सिंचन, तुषार सिंचन, गाळ युक्त शिवार या शासनाच्या योजनांचा लाभ घेतला आहे. शासनाच्या अनेक योजना कल्याणकारी आहेत. या योजनांचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याने घेतला पाहिजे. या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा विकास केला पाहिजे, मुलांना शिकवले पाहिजे, सुखी झाले पाहिजे. शासनाच्या विविध योजनांची माहिती मला या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळाली आहे. याचा उपयोग मी करणार आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा