महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
कीटनाशकाच्या विषबाधेने मृत शेतकरी कुटूंबियांना तात्काळ मदत देणार - पालकमंत्री बावनकुळे बुधवार, ११ ऑक्टोंबर, २०१७
शेतकरी कुटूंबियांच्या घरी जाऊन केले सांत्वन

नागपूर :
पीकावर कीटकनाशक फवारणीत विषबाधेने मृत्यू झाल्यामुळे शेतकरी कुटूंबावर मोठा आघात झाला आहे. अशा प्रसंगी शासनातर्फे आवश्यक ते संपूर्ण सहाय्य करण्यात येईल, असा विश्र्वास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मृत  शेतकऱ्यांच्या कुटूंबियांचे सांत्वन करताना दिला.

कळमेश्वर येथील मृतक शेतकरी माणिकराव सदाशिव शेंडे यांच्या निवासस्थानी भेट देऊन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्रीमती वंदना माणिकराव शेंडे व मुलगा वैभव शेंडे यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांचेसमवेत आमदार डॉ. आशिष देशमुख उपस्थित होते.

मौजा पिपळारिठी येथे शेतपिकांवर कीटकनाशक फवारणी करताना विषबाधेने शेतकरी माणिक सदाशिव शेंडे यांचे निधन झाले. त्यांनी त्यांच्या शेतात पी.एस. ग्रासिल नावाचे औषध फवारले. फवारणी दरम्यान ते बेशुध्द झाल्याचे कळताच उपचारासाठी कळमेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. त्यानंतर ऑरेंजसिटी हॉस्पीटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेमुळे शेंडे कुटूंबियांवर मोठा आघात झाला असून घरातील कर्तापुरुषाचे निधन झाल्यामुळे शेतकरी कुटूंबास अपघात विमा योजनेसह मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तात्काळ प्रस्ताव पाठवावा अशा सूचना तहसीलदार डॉ. हंसा मोहन यांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्यात.

शेतपिकांवर औषध फवारणी करताना वापरण्यात आलेल्या कीटकनाशकाच्या खरेदी संदर्भात संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशा सूचना देताना पालकमंत्री म्हणाले की, पत्नी वंदना माणिक शेंडे, मुलगी उज्वला, प्रीया व रिना, तसेच मुलगा वैभव व प्रशांत यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करावा. या कुटूंबांवर घडलेल्या दुर्देवी घटनेमुळे शासनातर्फे तसेच वैयक्तिकही कशी मदत करता येईल यादृष्टीनेही प्रयत्न असल्याची ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

पालकमंत्री यांनी काटोल, नरखेड तालुक्यातील शेतपिकांवर औषध फवारणीमुळे मृत झालेल्या खैरगाव येथील धनंजय कृष्णाजी वारोकर यांच्या निवासस्थानी जाऊन कुटूंबियांचे सांत्वन केले. शेतपिकांवर फवारणी करताना दुर्देवी घटना घडू नये यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन फवारणी संदर्भात मार्गदर्शन करावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्यात.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा