महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
सोलापूर, नगरपालिकांसाठी 20 टीएमसी पाणी आरक्षित मंगळवार, ०५ डिसेंबर, २०१७
  • पालकमंत्री देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय
सोलापूर : उजनी जलाशयातून सोलापूर शहर, सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा या नगरपालिकांसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणीपुरवठा योजनांसाठी 15 जुलै 2018 पर्यंत वीस टी. एम.सी. पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचा निर्णय आज घेण्यात आला.

पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त अविनाश ढाकणे, अधीक्षक अभियंता तथा कडाचे प्रशासक, शिवाजी चौगुले, भीमा कालवा मंडळाचे अधीक्षक अभियंता रा.ज.कांबळे, उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी आदी उपस्थित होते.

सीना नदीवरून मोहोळ नगरपालिकांसह इतर पाणी वापर संस्थासाठी सव्वा टीएमसी पाणी फेब्रुवारीनंतर आरक्षित ठेवले जाईल, असे श्री. चौगुले यांनी सांगितले. बोरी नदीतून 0.30 टी.एम.सी. पाणी दुधनी, मैंदर्गी आणि अक्कलकोट नगरपालिकांसाठी आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. हिळ्ळी बंधाऱ्यासाठी फेब्रुवारी – मार्चमध्ये भीमा नदीतून पाण्याचे एक आवर्तन सोडले जाईल, असे श्री. चौगुले यांनी सांगितले.

पिण्यासाठी नदीत पाणी सोडल्यानंतर नदीकाठचा वीजपुरवठा खंडीत केला जाईल, असे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सांगितले. यासाठी तहसीलदार, जलसंपदा, महावितरण यांच्या विभागाच्या अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करावी, अशा सूचना पालकमंत्री देशमुख यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना दिल्या.

श्री. चौगुले यांनी बैठकीत पाणी पट्टी थकित असल्याचा मुद्दा उपस्थित केला. सोलापूर महापालिकेकडे 52 कोटी रूपयांची पाणीपट्टी थकित आहे. ती भरावी अशी विनंती त्यांनी केली. जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडेही थकबाकी असल्याचे श्री. चौगुले यांनी सांगितले. यावर पाणीपट्टी थकित असणाऱ्या कारखान्यांबाबत शासकीय नियमानुसार कारवाई करावी, अशा सूचना श्री. देशमुख यांनी दिल्या.

सोलापूर जिल्हा परिषदेने पाणीपुरवठा अद्याप मागणी केलेली नाही. त्यांनी मागणी नोंदविल्यास ग्रामपंचायतीसाठी आवश्यक असणारे पाणी आरक्षण केले जाईल, असे श्री. चौगुले यांनी सांगितले. यावर ग्रामपंचायतीसाठी आवश्यक पाण्याची मागणी दोन दिवसात जलसंपदा विभागाकडे नोंदवावी, अशा सूचना पालकमंत्री देशमुख यांनी जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांना दिल्या. बैठकीस जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता एन.व्ही.जोशी, जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता यू.बी.माशाळे, महावितरणचे कार्यकारी अभियंता आर.एस.खडतरे, एन.एम.गयाळे, बी.के.नागणे आदी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा