महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
विद्यार्थ्यांनी शासनाशी जुडण्यासाठी लोकराज्यचे वाचन करा - संजीव जोशी बुधवार, १२ सप्टेंबर, २०१८
पालघर : विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन शासनाशी जोडले जाण्यासाठी लोकराज्यचे वाचन करावे,असे प्रतिपादन दै.राजतंत्र चे संपादक संजीव जोशी यांनी केले.

आज माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने डहाणू येथे करंदीकर महाविद्यालयात आयोजित लोकराज्य वाचक अभियानात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रवींद्र घागस उपस्थित होते.

यावेळी श्री.जोशी म्हणाले, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय जसे शासनाच्या योजना, धोरणांना लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करते त्याचबरोबर वृत्तपत्रांमधून व्यक्त झालेल्या जनमताला शासनापर्यंत पोहोचविण्याचे काम देखील करते. यामुळेच या प्रक्रियेत वृत्तपत्रांची भूमिका देखील महत्त्वाची ठरते. त्यामुळेच प्रामाणिकपणे काम करणारी वृत्तपत्रे अजूनही आपली विश्वासार्हता टिकवून आहेत. लोकशाही प्रक्रियेमध्ये नागरिक म्हणून तरूणांचा हवा तेवढा सहभाग दिसून येत नाही. त्यांची मतदानातील टक्केवारी वाढणे गरजेचे आहे. त्याचबरोबर तरूणांना शासनाच्या कामांची माहिती असणेही गरजेचे आहे. या कामी विद्यार्थी मोलाची भूमिका बजावू शकतात. लोकराज्य अशा माध्यमांपैकीच एक आहे, जे नागरिकांना शासनाच्या कामाशी जोडून ठेवते. शासनाच्या विविध योजनांची त्याद्वारे अधिकृत माहिती मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाद्वारे मिळणाऱ्या माहिती ऐवजी या माध्यमाचा आवर्जून उपयोग करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

प्रारंभी प्र.जिल्हा माहिती अधिकारी ब्रिजकिशोर झंवर यांनी महासंचालनालयाच्या कामाची ओळख करून देऊन लोकराज्य वाचनाचे महत्त्व पटवून दिले. त्याचबरोबर शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या माहिती दूत उपक्रमाची सादरीकरणाद्वारे ओळख करून दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.घागस यांनी महाविद्यालय राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी विद्यार्थी आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा