महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
लोकराज्य अभियान अनुभव समृध्द होण्यासाठी वाचन आवश्यक - आमदार प्रशांत ठाकूर बुधवार, १२ सप्टेंबर, २०१८
पनवेलच्या ठाकूर विधी महाविद्यालयात लोकराज्य वाचक मेळावा संपन्न

अलिबाग :
हातातल्या मोबाईलमध्ये माहितीचा भांडार उपलब्ध आहे. परंतु आयुष्यात यशस्वी होण्यासाठी वाचनाला पर्याय नाही. मान्यवरांच्या अनुभवातून शिकुन अनुभव समृध्द होण्यासाठी वाचन आवश्यक असून त्या दृष्टीने लोकराज्य वाचक अभियानाचे महत्त्व अनन्य साधारण आहे, असे प्रतिपादन सिडकोचे अध्यक्ष आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज येथे केले.

पनवेल येथील श्रीमती चांगु काना ठाकूर विधी महाविद्यालयात परिसंवाद सभागृहात मराठी वाड्:मय मंडळ व जिल्हा माहिती कार्यालय रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने लोकराज्य वाचक अभियानाचा शुभारंभ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास कोकण विभागाचे उपसंचालक (माहिती) डॉ.गणेश मुळे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.शितला गावंड, पंचायत समिती सदस्य ॲड. राज पाटील, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलींद दुसाने आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार ठाकूर यांच्या हस्ते लोकराज्य मासिकाच्या सप्टेंबर महिन्याचा `सामर्थ्य शिक्षणाचे समृध्द महाराष्ट्राचे` या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, कै.जनार्दन भगत, कै.चांगु काना ठाकूर, कै.श्रीमती भागुबाई चांगु ठाकूर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

आमदार ठाकूर म्हणाले की, आजवर मी जी काही वाटचाल केली आहे. त्यात वाचनाचा मोठा वाटा आहे. यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनातील प्रसंग सांगतांना आ.ठाकूर म्हणाले की, छत्रपती शाहू महाराजांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्वत्तेचा सन्मान केला. त्यांच्या जवळ द्रष्टेपण होता. हे द्रष्टेपण आपल्या अंगी येण्यास वाचनाची सवय उपयुक्त ठरू शकते. जीवनात चांगल काही करण्याचा ध्यास घेताना वाचनाचा व्यासंग आवश्यक आहे. यावेळी त्यांनी लोकराज्य अंकातील दर्जेदार मजकूर, मांडणी, छपाई याबद्दल कौतूक केले.

उपसंचालक डॉ.गणेश मुळे यांनी अधिकृत व विश्वसनीय माहितीसाठी लोकराज्य वाचन उपयुक्त ठरते असे सांगितले. प्रत्येक विषयाच्या सर्वांगिण अभ्यास होण्यासाठी नव्या पिढीने मोबाईल तंत्रज्ञान आत्मसात करतानाच वाचनाची सवय जोपासने आवश्यक आहे, असे सांगितले.

प्राचार्या डॉ.शितला गावंड यांनी लोकराज्य वाचक अभियानातून वाचन संस्कृतीची जोपासना होऊन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना ज्ञान समृध्द होण्यासाठी लोकराज्य वाचक अभियान उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ओम तोटवड (विद्यार्थी) यांनी केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा