महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
इंटरनेट व सोशल मीडियाचा वापर करताना सावधानता बाळगण्याची गरज - पोलीस निरीक्षक अरुण परदेशी शुक्रवार, ०३ जानेवारी, २०२०


अहमदनगर - महिला व मुलींनी इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर करताना अधिक सावधानता बाळगण्याची गरज आहे. त्याद्वारे कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी संपर्क टाळावा. आलेल्या अनोळखी कॉल्स अथवा मेसेजेसला प्रतिसाद देऊ नये आणि संभाव्य फसवणूक टाळावी, असे आवाहन अहमदनगर पोलीस दलाच्या सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण परदेशी यांनी केले.

सायबर सेफ वुमेन कार्यक्रमांतर्गत आज संपूर्ण राज्यात एकाच दिवशी इंटरनेटद्वारे होणारी फसवणूक, त्याचे प्रकार तसेच वापर करताना घ्यावयाची दक्षता आदींबाबत पोलीस दलाच्या सायबर पोलीस स्टेशनच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील मेहेकरी येथील श्री. सदगुरु माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. प्र.जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण, सायबर क्राईमचे पोलीस उपनिरीक्षक प्रतिक कोळी, सायबर तज्ज्ञ निलेश राळेभात आदींची यावेळी उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

यावेळी श्री. परदेशी यांनी, इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या गोष्टी पसरु नयेत आणि फसवणूक होऊ नये, यासाठी प्रत्येकाने दक्ष असले पाहिजे, असे सांगितले. सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढवून लैंगिक छळवणूक, आर्थिक फसवणूक असे प्रकार घडतात. ते टाळण्यासाठी अनोळखी व्यक्तींशी सोशल मीडियावरुन संपर्क टाळावा, असे आवाहन केले.

श्री. कोळी म्हणाले, आता अगदी शालेय मुलांच्या हातातही त्यांच्या पालकांनी मोबाईल दिले आहेत. त्यावरील ॲपचा वापर मुले करतात. मात्र, तंत्रज्ञान वापराची पुरेशी माहिती नसताना आणि त्यातील परिणामांची जाणीव नसताना वापर केल्याने गुन्हे घडतात. कायद्याचे उल्लंघन होते. त्यामुळे मुलामुलींनी अधिक जागरुकतेने सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

श्री. चव्हाण यांनी, सोशल मीडियाचा वापर करताना माहितीची खातरजमा करुन घ्यावी, असे सांगितले. कोणत्याही प्रकारे चुकीची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवली जाणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. अनोळखी व्यक्तींच्या सोशल मीडियावरील कोणत्याही प्रकारच्या फोन कॉल्स अथवा मेसेजेसला प्रतिसाद देऊ नये, किंवा माहिती सांगू नये, असे आवाहन त्यांनी केले.

सायबर तज्ज्ञ श्री. राळेभात यांनी तांत्रिक बाबींविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एटीएम कार्ड, सोशल मीडिया, ऑनलाईन विवाह नोंदणी आदी संकेतस्थळांवर माहिती देताना काळजी घ्यायची गरज असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. चौधरी यांनी केले. प्रास्ताविक मिनाक्षी मोरे यांनी केले तर आभार प्राचार्य अशोक अमृते यांनी मानले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा