महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मगावी राष्ट्रीय स्मारक व्हावे - प्रा.राम शिंदे शुक्रवार, १४ जुलै, २०१७
नवी दिल्ली : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव चौंडी येथे राष्ट्रीय स्मारक उभारावे, अशी मागणी जलसंधारण आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालक मंत्री प्रा.राम शिंदे यांनी आज केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री महेश शर्मा यांना केल्याची माहिती महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

शास्त्री भवनात आयोजित बैठकीत प्रा.शिंदे यांनी केंद्रीय मंत्री श्री.शर्मा यांची भेट घेऊन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मगावी राष्ट्रीय स्मारकाबाबतचे निवेदन सादर केले. इ.स. 1725 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यामधील चौंडी या गावात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्म झाला होता. वयाच्या 8 व्या वर्षी त्यांचे लग्न झाले. त्यांचे माहेरचे आडनाव शिंदे असून लग्नानंतर त्या होळकर झाल्या. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी आपल्या संपूर्ण कारर्किदीत अनेक ठिकाणी मंदिरे, घाट बांधले, लोककल्याण कार्यात आपले आयुष्य व्यतीत केले. नगर जिल्ह्यातही त्यांनी अनेक ठिकाणी घाट बांधलेले आहेत. त्यांचे वास्तव्य असलेले घर आजही चौंडी येथे आहे. हे ठिकाण राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषीत व्हावे, अशी मागणी अनेक वर्षापासून करण्यात येत आहे. याबाबत राज्य शासनाकडून तसेच भारतीय पुरात्तत्व विभागाकडून अहवाल मागवून या स्मारकाबाबत विचार केला जाईल, असे आश्वासन श्री.शर्मा यांनी दिले असल्याचे प्रा.शिंदे म्हणाले.


महाराष्ट्र परिचय केंद्राच्या बातम्यांसाठी फाॅलो करा : 
http://twitter.com/micnewdelhi

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा