महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महिलांना मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण व्हावा यासाठी प्रयत्नशील - दीपक केसरकर बुधवार, १० ऑक्टोंबर, २०१८
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील महिलांकरिता मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठीच कांदळवन संवर्धन व त्यातून उपजिविकेचे साधन निर्माण व्हावे, असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. कुडाळ येथील वासुदेवानंद सभागृहात वन विभाग व मँग्रो फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, उपवनसंरक्षक समाधाण चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य संजय पडते, कुडाळ पंचायत समितीचे सभापती राजेंद्र जाधव, युवक जिल्हा अध्यक्ष श्री. शिरसाट, माजी पंचायत समिती सदस्य श्री.बंगे, सामाजिक वनीकरण विभागाचे सहाय्यक संचालक श्री.बागडी, सहायक उपवनसंरक्षक श्री.पुराणिक, श्वेता हुले, मँग्रो फाऊंडेशनचे केदार पालव यांच्यासह वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, खाडी किनाऱ्यावरील गावांमधील कांदळवन संरक्षण समिती अध्यक्ष, सचिव, सदस्य, बचतगटांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केज फार्मिंगच्या माध्यमातून जिल्ह्यातील महिलांना रोजगार मिळावा, यासाठी खाडी किनाऱ्यांच्या 85 गावांची निवड करण्यात आली असल्याचे सांगून पालकमंत्री श्री.केसरकर म्हणाले की, या गावांमध्ये  ५०० पिंजरे मत्स्य व खेकडे पालनासाठी देण्यात येणार आहेत. फक्त मासे पकडणे आणि वाढवणे या पुरते काम आपण करायचे नाही तर माशांना होणाऱ्या रोगांविषयी संशोधन आणि उपचार याविषयी जिल्ह्यामध्ये तीन मोठ्या लॅब उभारण्यात येणार आहेत. तसेच जिल्ह्यात क्रॅब, मुसल्स, ऑस्टर यांची नर्सरी खाडी किनाऱ्यांच्या प्रदेशात उभारण्यात येणार आहेत. यातील खेकडे, ऑस्टर, मुसल्स बचतगटांच्या माध्यमातून तसेच कांदळवन संरक्षण समितीच्या माध्यमातून पुरवण्यात येतील. त्याचे उत्पादनानंतर खरेदीसाठीही नियोजन केले जाणार आहे. याशिवाय वेनामी प्राँजला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यासाठी सागरेश्वर येथे वेनामी प्राँजची हॉचरी उभारण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या आर्थिक विकासासाठी मोठा निधी जिल्ह्यामध्ये दिला गेला आहे. हा निधी योग्यरित्या खर्च व्हावा यासाठी आपणा सर्वांनी साथ देण्याची गरज असल्याचे ते यावेळी म्हणाले.

झाडं ही जशी डोंगराळ भागासाठी महत्त्वाची आहेत तशीच कांदळवन किनारी भागासाठी महत्त्वाची असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे म्हणाले, कांदळवनात कार्बन शोषणाचे प्रमाण चांगले असते. त्याचबरोबर ऑक्सिजनची निर्मितीही मोठ्या प्रमाणावर करण्याची क्षमता त्यामध्ये असते. कांदळवन न तोडणे हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. सागर किनाऱ्याच्या सुरक्षेसाठी कांदळवनांचे संवर्धन गरजेचे आहे. कांदळवनांच्या संरक्षणातून उपजिविकेचे स्त्रोत निर्माण करावेत, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.

उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी प्रास्ताविकात वन विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेतला. त्यामध्ये आंबोली, चौकुळ यासह कांदळवन परिसरातील योजनांची माहिती दिली. तर स्वामिनी महिला बचत गटाच्या श्वेता हुले यांनी कांदळवन संवर्धनाबाबतचे त्यांचे अनुभव सांगितले. यावेळी आरोंदा कांदळवन समितीला  २५ एलपीजी कनेक्शनचे वितरण पालकमंत्री यांच्याहस्ते करण्यात आले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा