महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
26 जानेवारी 2018 पर्यंत धुळे जिल्हा हागणदारी मुक्त करा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवार, १७ मे, २०१७
धुळे : येत्या 26 जानेवारी 2018 पर्यंत धुळे जिल्हा स्वच्छ भारत अभियानानुसार हागणदारी मुक्त झाला पाहिजे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

शिंदखेडा येथे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत धुळे जिल्हा आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, संरक्षण राज्य मंत्री डॉ. सुभाष भामरे, रोहयो मंत्री जयकुमार रावल, अपर मुख्य सचिव डॉ. प्रवीणसिंह परदेशी, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, स्वच्छ भारत अभियान, जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, नरेगांतर्गत विहिरी या योजना महत्त्वाकांक्षी योजना असून त्यावर अधिक भर देण्यात आला आहे. धुळे जिल्ह्याने येत्या 26 जानेवारी 2018 पर्यंत ग्रामीण आणि नागरी भागात शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट साध्य केले पाहिजे. जिल्हा स्वच्छ भारत अभियानानुसार हागणदारी मुक्त झाला पाहिजे.

जलयुक्त शिवार अभियानाचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले, जलसंधारणाची कामे म्हणजे एक प्रकारची गुंतवणूक असून या कामांचा वर्षानुवर्षे लाभ होणार आहे. या अभियानातील कामे 20 जून पूर्वी ‘मिशन मोड’ वर पूर्ण झाली पाहिजे. जलयुक्त शिवारच्या कामांमुळे गावागावांत परिवर्तन होताना दिसतेय. कमी पाऊस झाला तरी जलसंचय होऊ शकतो. साठवणुकीची व्यवस्था जलयुक्तमुळे होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

जिल्ह्यात ‘डिजिटल शाळा’ हा उपक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दलही त्यांनी अभिनंदन केले. राज्यात 40 हजार शाळा ‘डिजीटल’ झाल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी एका शाळेला भेट दिल्याचे सांगून या शाळांमधील मुलांनी आनंददायी शिक्षणपद्धतीचे सादरीकरण केल्याचे खास करून सांगितले.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामांचा आढावा घेऊन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या कामांना गती देण्याचे तसेच कामांचा दर्जा उत्तम राहील, याची दक्षता घेण्याच्या दिल्या. सुरवाडे-जांबफळ प्रकल्पामुळे धुळे जिल्ह्यातील दोन-तीन तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न सुटू शकतो, याकरिता केंद्राकडे निधीची मागणी करणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

रोहयो मंत्री जयकुमार रावल यांनी मुख्यमंत्री हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांच्या भेटीमुळे अधिकारी – कर्मचाऱ्यांनाही प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. मराठवाडा, विदर्भाप्रमाणे खान्देशाच्या विकासासाठी अधिकाधिक निधी मिळावा, अशी विनंती त्यांनी केली.

संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनीही जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मागच्या अंदाजपत्रकात मंजूर दिली. त्यातील 50 टक्के वाटा राज्य शासनाने उचलावयाचा आहे. याबाबत नुकतीच बैठक झाली असून लवकरच हे काम मार्गी लागेल, असे ते म्हणाले. जिल्ह्याच्या सिंचनासाठी अधिकाधिक निधी मिळावा, आवश्यकता भासल्यास केंद्रीय जलसंसाधन मंत्री श्रीमती उमा भारती यांच्याकडे एकत्रित विनंती करु, असेही ते म्हणाले.

तत्पूर्वी मुख्यंमत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण झाले. या इमारतीत तहसील कार्यालय, उपकोषागार, विभागीय वनपाल, तालुका कृषी, तालुका निबंधक आदी कार्यालये, सभागृह यांचा समावेश आहे. या इमारतीचा बांधकाम खर्च 536.90 लक्ष रूपये असून लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या उत्कृष्ट समन्वयाचा परिपाक म्हणून ही सुंदर वास्तू शिंदखेडा शहराच्या सौंदर्यात भर टाकणारी आहे. बैठकीचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केले. बैठकीस विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा