महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
मध्यवर्ती बसस्थानक बांधकाम लवकर पूर्ण करण्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांचे निर्देश रविवार, १२ जानेवारी, २०२०
रत्नागिरी - येथील मध्यवर्ती बसस्थानकाचे काम अतिशय संथ गतीने चालू आहे. ते लवकर पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आवश्यक आहे. असे नियोजन करुन त्यावर कार्यवाही करा असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले.


आपल्या रत्नागिरी भेटीत त्यांनी आज सकाळी या कामाची पाहणी केली. यावळी पत्रकारांशी त्यांनी वार्तालाप केला. या वेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण तसेच एस.टी. महामंडळाच्या कार्यकारी अभियंता विद्या भिलारकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कामास विविध कारणांनी आजवर विलंब झाला आहे. यापुढील काळात तसे होणार नाही याची खबरदारी घ्या असे सामंत यावेळी म्हणाले. कामावर नियमित लक्ष ठेवण्यासाठी एका सल्लागाराची नियुक्ती करण्याची सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केली त्यास यावेळी मान्यता देण्यात आली.

बस स्थानकाच्या कामामुळे नागरिक आणि प्रवासी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रवासी स्थानकासमोर मुख्य मार्गावर उभे असतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. यासाठी लगेच दुसऱ्या ठिकाणावरुन बस सुटतील याची व्यवस्था करा त्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या त्वरित देण्यात येतील असेही ते म्हणाले.

एक ते दीड महिना कालावधीत बांधकाम प्रगतीपथावर आहे असे दिसले नाही तर संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा-

या कामाला गती देण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी लगेच कार्यालयात बैठक घेतली व विविध विभागांना सूचना दिल्या.

या बैठकीस कार्यकारी अभियंता विद्या भिलारकर, तहसीलदार शशिकांत जाधव, न.प. मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, आगार व्यवस्थापक अजय मोरे आदींची उपस्थिती होती.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा