महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
अटल विश्वकर्मा सन्मान योजना : पालकमंत्र्यांच्या हस्ते कामगारांना नोंदणी प्रमाणपत्राचे वितरण बुधवार, ०४ जुलै, २०१८
विशेष नोंदणी अभियानांतर्गत जिल्ह्यातील कामगारांची होणार नोंदणी
कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी साधला व्हीसीद्वारे संवाद

यवतमाळ :
अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कामगारांची नोंदणी करण्यासाठी जिल्ह्यात विशेष नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. या संदर्भात पालकमंत्री मदन येरावार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सरकारी कामगार विभागात कामगार विभागाच्या स्टॉलचे उद्घाटन केले. यावेळी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत दोन मजूरांची नोंदणी करण्यात आली. तसेच जिल्ह्यात सर्वात पहिल्यांदा नोंदणी झालेले राजेंद्र चंदनकार आणि संजय बोरकर या कामगारांना पालकमंत्र्याच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

जिल्ह्यात सदर अभियान 4 जुलै ते 4 ऑगस्ट 2018 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. यवतमाळ जिल्ह्याला जवळपास 20 हजार कामगार नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यासंदर्भात कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी नागपूरवरून व्हीसीद्वारे संवाद साधला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या व्हीसीला नगराध्यक्षा कांचन चौधरी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अमन गावंडे, जिल्हा कामगार अधिकारी व विशेष नोंदणी अभियान प्रमुख राजदीप धुर्वे उपस्थित होते.

दि. 23 फेब्रुवारी 2018 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बांधकाम कामगारांच्या विशेष नोंदणी अभियानाचा ई- शुभारंभ करण्यात आला होता. सुरवातीला प्रायोगिक तत्वावर राज्यातील केवळ 6 जिल्ह्यात बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आली. यात यवतमाळ जिल्ह्याचा समावेश नव्हता. पालकमंत्री मदन येरावार यांनी याबाबत पुढाकार घेऊन नोंदणी अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात यवतमाळ जिल्ह्यातील कामगारांचा समावेश केला आहे. 4 जुलैपासून जिल्ह्यात या नोंदणी अभियानाला सुरुवात होणार आहे.

यासंदर्भात जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधताना कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांनी नोंदणी अभियानाच्या पहिल्या टप्प्यात अतिशय चांगले काम केले. राज्यात सुरुवातीला केवळ 3 लक्ष कामगारांची नोंदणी होती. आजघडीला संपूर्ण राज्यात 9 लक्ष कामगारांनी नोंदणी केली आहे. समाजातील शेवटच्या घटकातील लोकांना न्याय देणारा हा विभाग आहे. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी प्रत्येक कामगारांपर्यंत पोहचून त्यांची नोंदणी करावी. मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या कामगारांच्या याद्या घेऊन त्यांनासुध्दा नोंदणी अभियानात सामील करून घ्यावे. कामगार विभागामार्फत 28 कल्याणकारी योजनांचा कामगारांना लाभ देण्यात येतो. या कल्याणकारी योजनांची माहिती कामगारांपर्यंत पोहचवा, अशा सूचना त्यांनी केल्या.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा