महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
राज्यातील 31 लाख शेतकऱ्यांना ‘इन्स्टिट्युशनल क्रेडिट सिस्टीम’मध्ये आणणार- मुख्यमंत्री शुक्रवार, ०७ एप्रिल, २०१७
विधानपरिषद इतर कामकाज:

मुंबई :
राज्यातील 31 लाख शेतकऱ्यांना संस्थात्मक पत प्रणाली (इन्स्टिट्युशनल क्रेडिट सिस्टीम)मध्ये आणण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. शेती क्षेत्रात गुंतवणूक करुन शेतकरी पुन्हा कर्जात जाणार नाही यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.

अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हा प्रस्ताव मांडला.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, राज्याच्या कृषी क्षेत्राची उत्पादकता कमी आहे. ही उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढविणे आवश्यक आहे. त्यामुळे या आव्हानाला संधी मानून काम करण्याची आवश्यकता आहे. शेती क्षेत्र गुंतवणुकीकडे नेले पाहिजे म्हणून गुंतवणुकीवर आधारित धोरण तयार करण्यात येत आहे. राज्यात गेल्या वर्षीपेक्षा पाचपटीने तुरीचे उत्पादन वाढले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊनही तुरीचे भाव कमी झाले नाहीत. राज्य शासनाने बाजारपेठेत हस्तक्षेप केल्याने तुरीचे भाव कोसळले नाहीत. यावर्षी ‘नाफेड’च्या माध्यमातून 20 लाख क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. तुरीबरोबरच उडीद आणि हरभऱ्यालाही यावर्षी चांगला भाव मिळाला आहे.

जलसंधारण व सिंचनामुळे शेतीचे उत्पादन वाढले

राज्यात जलसंधारण आणि सिंचनाची कामे मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतीचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे शेती क्षेत्राचा विकासदर 12.5 टक्क्यांवर गेला आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन गेल्या वर्षापेक्षा 40 हजार कोटी रुपयांनी वाढले आहे. त्यामुळे शेती क्षेत्रात गुंतवणुकीचे महत्व मोठे आहे.

राज्यातील शेतीची उत्पादकता अजून वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना पाण्याची शाश्वती देणे आवश्यक आहे. राज्यात नानाजी देशमुख कृषी समृद्धा प्रकल्प ही पाच हजार कोटी रुपयांची योजना राबविण्यात येणार आहे. ही योजना विदर्भातील 4 हजार गावांमध्ये राबविली जाणार आहे.

वर्धा व जामनेरला वस्त्रोद्योग पार्क; मोर्शीला संत्रा प्रक्रिया उद्योग

ज्या भागात कृषी प्रक्रिया उद्योग आहे, तेथे शेतमालाला चांगला भाव मिळतो. राज्यात अमरावती येथे एकात्मिक वस्त्रोद्योगाला फायदा झाला असून त्याच धर्तीवर वर्धा आणि जामनेर येथे असे पार्क सुरु करण्यात येत आहेत.

मोर्शी येथे संत्रा प्रक्रिया उद्योग उभारण्यात येणार आहे. फलोत्पादन होणाऱ्या क्षेत्रातच प्रक्रिया उद्योग उभारल्यास शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो, हे लक्षात घेऊन प्रकल्प उभारण्यात येत आहेत.

शेती क्षेत्रात 19 हजार कोटींची भांडवली गुंतवणूक

राज्यात 31 हजार कोटी रुपये भांडवली गुंतवणूकीपैकी 19 हजार कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक शेती क्षेत्रात झाली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

समृद्धी महामार्ग, मेट्रोमुळे विकासाला चालना

नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गामुळे राज्यातील 24 जिल्हे एकाच रस्त्याने जोडले जाणार आहेत. या रस्त्यांमुळे विदर्भ मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. त्याचबरोबर मेट्रो, बुलेट ट्रेनमुळे राज्यात रोजगार वाढण्यास मदत होणार असल्याचेही श्री.फडणवीस यांनी सांगितले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा