महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
शिरोळ तालुक्यातील कॅन्सर रुग्णांसाठी कॅन्सर प्रतिबंधक लस उपलब्ध करुन देणार - चंद्रकांत पाटील शनिवार, १४ एप्रिल, २०१८
पैशाअभावी एकही रूग्ण आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही

कोल्हापूर :
शिरोळ तालुक्यातील कॅन्सर रुग्णांसाठी आवश्यक असणारी कॅन्सर प्रतिबंधक लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन देण्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केली.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष मंत्रालय, आमदार उल्हासदादा पाटील युथ फाऊंडेशन, रोटरी लायन्स, इनरव्हील क्लब, तालुक्यातील तरुण मंडळे तसेच सर्व सेवाभावी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने नृसिंहवाडी येथे आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास आमदार उल्हास पाटील, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष तथा विशेष कार्य अधिकारी कक्ष प्रमुख, डॉ.ओमप्रकाश शेटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील, तहसिलदार गजानन गुरव, समन्वयक राजेश सोनार, विकास पुजारी, अनिल यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

शिरोळ तालुक्यात कॅन्सयर रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ चिंताजनक असून याबाबत आवश्यक प्रतिबंधक उपाय आणि जनजागृती करण्यास प्राधान्य दिले जाईल, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शिरोळ तालुक्यातील कॅन्सर रुग्णांची तपासणी आणि प्रभावी जागृतीसाठी जिल्हा नियोजन समितीमधून 28 लाखाचा निधी उपलब्ध करुन दिला असून यापुढील काळात मागेल त्याला सर्वाईकर कॅन्सर प्रतिबंधक लस उपलब्ध करुन देऊन कॅन्सरला प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

एकही रूग्ण पैशाअभावी आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही या दृष्टिने आवश्यक ती व्यवस्था राज्य शासनाने प्राधान्यक्रमाने उपलब्ध करून दिली आहे. राज्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून आतापर्यंत सर्वसामान्य, गोरगरीब लोकांच्या उपचारांसाठी 650 कोटी रूपयांचा निधी शासनाने उपलब्ध करून दिला आहे, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महात्मा फुले आरोग्यदायी योजनेतून 1200 आजारांसाठी दीड लाखाची मदत शासनामार्फत केली जात आहे. याशिवाय दुर्धर आजारांवर उपचार, शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सहाय्य केले जात आहे.

जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून 400 शालेय विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात येत आहेत. यामधील 57 विद्यार्थ्यांवर हृदय शस्त्रक्रिया मुंबई येथे करण्यात येणार असून 16 रूग्णांची पहिली बॅच मुंबईला पाठवली आहे. 6 जणांवर शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून उर्वरीत मुलांवर प्राधान्याने शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. हा सर्व खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षा बरोबरच वेगवेगळ्या ट्रस्टमधून करण्यात येत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे कोणीही गरजवंत उपचारापासून वंचित राहणार नाही. यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी आमदार उल्हास पाटील, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष तथा विशेष कार्य अधिकारी कक्ष प्रमुख डॉ.ओमप्रकाश शेटे यांनीही मुख्यमंत्री सहायता कक्षामधून आरोग्य सेवेसाठी करण्यात येत असलेल्या विविध उपाय योजनांची माहिती दिली. आरोग्य सेवे पासून कुणीही वंचित राहू नये यादृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष अधिक गतीमान केला आहे.

प्रारंभी समन्वयक राजेश सोनार यांनी स्वागत करून प्रास्ताविकात या शिबिराचा उद्देश विशद केला. या कार्यक्रमास अनेक मान्यवर पदाधिकारी व वैद्यकीय अधिकारी आणि नागरीक यांच्यासह शिबीरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा