महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
उद्योजकांनी कृषी उद्योगांतील गुंतवणुकीवर भर द्यावा - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रविवार, १२ जानेवारी, २०२०
औरंगाबाद - मराठवाड्यात कृषी आधारित उद्योग वाढण्याची आवश्यकता असून कॉर्पोरेट उद्योजकांनी कृषी उद्योगांतील गुंतवणुकीवर अधिक भर द्यावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते, परिवहन महामार्ग सूक्ष्म लघु आणि मध्य उद्योग विभाग मंत्री नितिन गडकरी यांनी आज येथे केले.

चेंबर ऑफ कॉमर्स व्दारा आयोजित एसएसएमई असोसिएशनच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना ते बोलत होते. उद्योजकांनी कृषी आधारित खादी उद्योग, शेरी कल्चर, फर्नीचर, बायोइंधन, बांबु तसेच सोलार क्लस्टर यासारख्या उद्योगांवर भर द्यावा. ग्रामीण उद्योगांचा विकास झाल्यास शहरी उद्योगांवर ही सकारात्मक परिणाम होतो. असेही ते म्हणाले.

यावेळी श्री. गडकरी यांनी एसएसएमईच्या विविध समस्या जाणून घेतल्या. तसेच उद्योगांच्या विविध धोरणांबाबत चर्चा करून भविष्यातील उद्योगांपुढे येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी तत्पर असल्याचे सांगितले. त्याचबरोबर उद्योजकांनी उद्योगांसाठी बँकांवर अवलंबून राहण्यापेक्षा स्टॉक एक्सचेंज मध्ये गुंतवणूक करावी. तसेच उद्योगांतील नवनिर्मितीवरही भर द्यावा, असे श्री. गडकरी म्हणाले.

यावेळी सर्वश्री आमदार हरिभाऊ बागडे, संभाजी पाटील निलंगेकर, अतुल सावे, केंद्रीय उद्योग सचिव राममनोहर मिश्रा, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, मराठवाडा लघुउद्योग व कृषी संघटना औरंगाबादचे अध्यक्ष डी.एल.राजळे, तसेच उद्योजक राम भोगले, ऋषीकुमार बागला, किशोर राठी, मुकुंद कुलकर्णी, एच.डी.कापसे, मानसिंग पवार इतर उद्योजक, तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


मराठवाड्यातील रस्ते कामांचा घेतला आढावा
उद्योजकांशी संवाद साधल्यानंतर श्री. गडकरी यांनी मराठवाड्यातील रस्ते कामाचा आढावा घेतला. यावेळी जिल्ह्यातील औरंगाबाद-शिर्डी, सोलापूर-धुळे, औरंगाबाद-जळगाव रस्त्यांची कामे सुरू असून लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. तसेच परभणी-जिंतूर रस्त्याबाबतची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार असल्याचे श्री. गडकरी यांनी सांगितले. शेंद्रा-बिडकीन कॉरीडोर, औट्रम घाट बोगद्याचेही काम पहिल्या टप्प्यात पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले. रस्त्यांचा विकास झाल्यास उद्योग व पर्यटन वाढीवर नक्कीच सकारात्मक परिणाम होणार असल्याचेही यावेळी श्री. गडकरी यांनी सांगितले.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा